Pimpri : समरसता विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रमेश पतंगे

एमपीसी न्यूज – नियोजित दहाव्या समरसता विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, पत्रकार रमेश पतंगे यांची निवड करण्यात आली आहे. उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून समरसता साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने गुरुवार, दिनांक 03 जानेवारी 2019 रोजी आकुर्डी येथील खंडोबा सांस्कृतिक भवनात एक दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात शहरातील तेरा महाविद्यालयांचे निवडक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या रमेश पतंगे यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांत एम.ए.ची पदवी संपादन केली आहे. साप्ताहिक विवेकचे माजी संपादक असलेल्या पतंगे यांची ‘समरसता संघर्ष मानवाचा’ , ‘बहुस्पर्शी विवेकानंद’ , ‘महामानव अब्राहम लिंकन’ इत्यादी पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. ‘आजघडीचा हिंदुस्थान’ प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आणि केंद्रीय परिनिरीक्षण महामंडळाचे ते सदस्य असून त्यांना पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते पांचजन्य पुरस्कार, मध्यप्रदेश सरकारचा माणिकचंद वाजपेयी राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार यांसह अनेक सन्मान प्राप्त झालेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.