Pimpri : महापालिकेच्या भंगार साहित्याचा होणार लिलाव, महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भंगार साहित्याचा लिलाव केला जाणार आहे. याबाबतच्या उपसूचनेला शुक्रवारी (दि. 20) महासभेने मान्यता दिली.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे टाटा एस वाहनांचे लोडबॉडी भंगार साहित्य जमा झाले होते. या साहित्याचे ए. व्ही. शेवडे अ‍ॅण्ड असोसिएटस् यांच्याकडून मूल्यांकन करुन घेण्यात आले. चालू बाजारभावानुसार त्याचे 23 लाख 62 हजार 500 रुपये मूल्यांकन करण्यात आले आहे.

महापालिकेच्या लिलाव समितीनेही या साहित्याचा ई-लिलाव करण्याची शिफारस केली आहे. महापालिकेची कोणतीही स्थावर अथवा जंगम मालमत्ता विक्री करण्यासाठी महासभेची मान्यता आवश्यक असल्याने याबाबतची उपसूचना महासभेत विनाचर्चा मंजूर करण्यात आली.

दरम्यान, भोसरी ते दिघी रस्त्यावरील सीएमई भिंतीलगत सर्व्हे क्रमांक 69, 72 व 84 येथील जागेचे रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. यामध्ये बाधित होणार्‍या नागरिकांचे सर्वेक्षण करून त्यांना महापालिकेच्या घरकुल योजनेत प्राधान्याने घरकुल वाटप करण्यात येणार आहे. याबाबतच्या उपसूचनेलाही महासभेत मंजुरी देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.