Pimpri : सत्ता संपादनाचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार पक्का -अशोक सोनोने

एमपीसी न्यूज – सत्ता संपादन करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार पक्का असून लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचे नियोजन झाले आहे. शुक्रवारी सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीवर डोळा ठेवून सादर केला आहे. हे बजेट म्हणजे ‘एक वर्षाचे बजेट आणि दहा वर्षांची स्वप्न’ असे आहे. शेतक-यांना पूर्ण कर्जमाफी देऊ, बेरोजगारांना रोजगार देऊ, अशी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने या सरकारला पूर्ण करता आली नाहीत, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अशोकभाऊ सोनोने यांनी पिंपरी, पुणे येथे शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.

यावेळी शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, महिला शहराध्यक्षा लता रोकडे, अनिल जाधव, डॉ. संजय सोनेकर, अरुण चाबुकस्वार, शहर प्रवक्ते के. डी. वाघमारे, शहर महासचिव सुहास देशमुख आदी उपस्थित होते.

याबाबत सोनोने म्हणाले, राज्यात 1972 साली पडला होता, तेवढा दुष्काळ यंदाही आहे. राज्यात अकरा हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या असताना ग्रामीण भागाला निधी देण्याऐवजी मेट्रो सिटींवर या बजेटमध्ये जास्त तरतूद करण्यात आली आहे. सरकारच्या अहवालाप्रमाणे मागील वर्षी नोटाबंदीमुळे पंच्चेचाळीस टक्के रोजगार घटला आहे. ‘बहुजन सारे एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ; आता भिक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची’ दिल्ली विधानसभेत ज्याप्रमाणे सत्ता परिवर्तन झाले. त्याप्रमाणे आलटून पालटून सत्ता उपभोगणारे भाजप सेना, कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना दूर ठेवून तिस-या वंचित बहुजन आघाडीला सत्ता देण्याचा निर्धार जनतेने केला आहे, असे सोनोने यांनी सांगितले.

…अन्यथा,  तीव्र आंदोलन करणार

शहराध्यक्ष देवेंद्र तायडे म्हणाले, सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणाला कंटाळून हजारो शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्यांची लाट उद्योग नगरी पिंपरी चिंचवडला देखील आल्याचे दिसत आहे. हिंदूस्थान अँन्टीबोयोटिक्स कंपनीतील कामगारांना मागील वीस महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. या आर्थिक विवंचनेतून शुक्रवारी रामदास उकीरडे या कामगाराने आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एच.ए.च्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा, भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी तायडे यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.