Pimpri : मान्सून पूर्व पावसामुळे महावितरणचा फज्जा; उद्योजक दोन दिवस अंधारात

उद्योजकांचे करोडो रुपयाचे नुकसान; आमदार महेश लांडगे यांनी मंगळवारी (दि.११जून) महावितरणच्या भोसरी विभागीय कार्यालयातील अधिकारी यांची बोलवली बैठक

एमपीसी न्यूज – पहिल्याच मान्सून पूर्व पावसात महावितरणच्या नियोजनाचा फज्जा उडाला. औद्योगिक परिसरात अघोषित भारनियमन, उद्योगाचे करोडो रुपयाचे नुकसान झाल्याने पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेतर्फे महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालला.

रविवारी (दि.9) संध्याकाळी झालेल्या मान्सून पूर्व पावसात महावितरणच्या नियोजनाचा फज्जा उडाला. पावसात संपूर्ण औद्योगिक परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला .त्यातील काही भागात रात्री वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. परंतु सोमवारी (दि.10) दुपारी चार वाजेपर्यंत शांतीनगर, पेठ क्रमांक 7 आणि 10एमआयडीसीमधील एस. टी.जे आदी ब्लॉकमध्ये वीजपुरवठा सुरळीत झाला नाही.

  • वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखालील उद्योजकांनी महावितरणच्या भोसरी विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे शाशिकांत सराफ, शांताराम पिसाळ, सचिन आडक, मनसुख यांच्या सह जवळपास 150 उद्योजक जमा झाले होते.

शांतीनगर येथे केबल खराब होऊन आग लागली होती त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महावितरणचे अधिकारी भरणे आणि सागरे शांती नगर येथे आले होते. तेथे उद्योजकांनी त्यांना घेराव घातला आणि नवीन केबल टाकाव्यात. नवीन विद्युत रोहित्र बसवावे, अशी मागणी केली. एवढे करूनही वीजपुरवठा सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरळीत झाला नव्हता.

  • त्यामुळे त्रस्त उद्योजकांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची भेट घेऊन त्यांना परिस्थिती अवगत करून दिली. याविषयी तोडगा काढण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी उद्या मंगळवारी (दि.11 जून) महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि भोसरी विभागीय कार्यालयातील अधिकारी यांची बैठक बोलवली असून अडचणी मांडण्यासाठी संघटनेस आमंत्रित केले आहे.

आधीच वाढत्या वीज दरामुळे उद्योजक हैराण झाले असून त्यातच महावितरणने पावसाळापूर्वीची देखभाल दुरुस्तीची कामे केली नाहीत. त्यामुळे पहिल्याच मान्सून पूर्व पावसात संपूर्ण औद्योगिक परिसर अंधारात गेला असून त्यामुळे उद्योजकांचे करोडो रुपयाचे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई कोण करणार ?असा प्रश्न पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी विचारला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.