Pimpri : राज्यघटनेचे 370 वे कलम रद्द करण्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी मिळेल – डॉ. गोविंद कुलकर्णी

एमपीसी न्यूज – जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे भारतीय राज्यघटनेचे 370 वे कलम रद्द करण्याबाबत केंद्र शासनाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने स्वागत केले आहे. केंद्र शासनाचा हा निर्णय राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी देणारा आहे, अशी प्रतिक्रिया महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

राज्यसभेत सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० रद्द करण्याबाबत प्रस्ताव सादर केला. जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्याची घोषणा करत शहा यांनी त्या संदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेत मांडले. सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीर व लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश होणार आहेत. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच अस्तित्व कायम राहणार आहे.

  • केंद्र सरकारच्या या निर्णयांमुळे जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा आपोआपच कालबाह्य झाला आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने शासनाच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. दोन्ही सभागृहांनी हे घटनादुरुस्ती विधेयक एकमताने मंजूर करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम 370 मुळे दहशतवादाला खतपाणी मिळत आहे. या कलमाअंतर्गत पाकिस्तानी नागरिक जम्मू-काश्मीरच्या महिलेशी लग्न करून काश्मीरचे नागरिकत्व पत्करू शकतो. अशा रीतीने पाकिस्तानी दहशतवाद्यांनाही काश्मीरचे नागरिकत्व सहज मिळते. जम्मू-काश्मीरमध्ये माहितीचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार यासारखे कायदे लागू होत नाहीत.

  • कलम 370 मुळे तेथील नागरिक या कायद्यांच्या लाभांपासून वंचित राहत आहेत. तेथे माहिती अधिकार कायदा केवळ केंद्र सरकारच्या कार्यालयांसाठीच लागू होतो. जम्मू-काश्मीर राज्यातील अल्पसंख्याकांच्या हितांसाठी भारत सरकार कलम 370 अंतर्गत काहीच करू शकत नाही. जम्मू-काश्मीर सरकार अल्पसंख्याकांच्या हितांकडे दुर्लक्ष करत होते. काश्मिरी पंडितांवर गेली कित्येक दशके अनन्वित अत्याचार झाले आहेत. कलम 370 रद्द होण्यामुळे काश्मिरी पंडितांना व सर्वच अलपसंख्यांकांना संरक्षण व त्यांचे न्याय्य मिळू शकतील, असा विश्वास महासंघाने पत्रकात व्यक्त केला आहे.

केंद्रातील भाजप सरकारच्या काही धोरणांबाबत मतभेद असले तरी जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर महासंघ भाजप सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही डॉ. कुलकर्णी यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.