Pimpri: ‘विरोधकांचे मारल्यासारखे अन्‌ सत्ताधा-यांचे रडल्यासारखे’!

महासभेत भाजप-राष्ट्रवादीचे अनोखे गठबंधन!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महासभेत चिखलीतील संतपीठ, भोसरीतील रुग्णालयाचे खासगीकरण याविषयावर साधक-बाधक चर्चा होणे अपेक्षित होते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही नगरसेवकांची देखील चर्चेची अपेक्षा होती. मत-मत्तांतरे व्हायला हवी होती. मात्र, ‘ठरल्याप्रमाणे’ प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी गोंधळ घातला. तर, सत्ताधा-यांनी आम्ही रडल्यासारखे करतो या ‘ठरलेल्या’ ड्रामेबाजीप्रमाणे सभाकामकाज पूर्ण केले. केवळ दोन मिनिटात महत्वाचे विषय मंजूर केले. यामुळे महासभेत भाजप-राष्ट्रवादीचे अनोखे गठबंधन समोर आले. दरम्यान, विरोधकांनी संसदीय आयुधांचा वापर करुन चर्चा घडविणे अपेक्षित होते. चर्चेचा आग्रह धरायला हवा होता. सत्ताधा-यांना जेरीस आणून विषय मागे घ्यायला भाग पाडायला पाहिजे होते, असे भाजपच्याच काही नगरसेवकांनी पत्रकारांशी खासगीत बोलून दाखविले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची जानेवारी महिन्याची तहकूब सभा आज (सोमवारी) पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहूल जाधव होते. विषयपत्रिकेवर चिखलीत उभारण्यात येणा-या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ आणि कंपनीच्या संचालक मंडळाला मान्यता, महापालिकेचे भोसरीतील रुग्णालय खासगी संस्थेला 30 वर्षे कराराने चालवायला देणे, महापालिकेच्या 40 टक्के हिश्याप्रमाणे पीएमपीएमएला 160 बस खरेदी करण्याकरिता प्रतिबस 48 लाख 40 हजार यानुसार 160 बसेसासाठी 77 कोटी 44 लाख 72 हजार 800 रुपये पीएमपीला टप्प्या-टप्याने गरज आणि मागणीनुसार वर्ग करणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लॉन टेनिस कोर्टवर भारतीय टेनिस टिमचे प्रशिक्षक नंदन बाळ हे शहरातील 50 खेळाडूंना टेनिसचे शास्त्रोक्‍त प्रशिक्षण देण्यास मान्यता देणे, असे महत्वाचे विषय होते.

सभा कामकाज सुरु होण्याच्या अगोदर विरोधी पक्षनेत्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचे फलक हातामध्ये घेऊन महापौरांच्या आसनासमोरील हौदात आंदोलन केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते दत्ता साने संत पीठावर बोलत होते. विकासकामातील होणा-या ‘रिंग’ बाबत बोलत असताना माजी महापौर नितीन काळजे यांनी त्यांला आक्षेप घेत साने यांना मध्येच अडविले. साने यांनी संत पीठावर बोलावे, असे काळजे म्हणाले. त्यानंतर साने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली. वादावादी सुरू असतानाच महापौर जाधव यांनी अचानक संतपीठाच्या विषयासह दोन विषय मंजूर केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापौरांनी सभाकामकाज एक तासासाठी तहकूब केले.

  • राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर
    संतपीठाचा विषय गदारोळात मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भोसरीतील रुग्णालयाच्या खासगीकरणावर चर्चा करणे अपेक्षित होते. परंतु, पुन्हा सभा कामकाज सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी ‘ठरल्याप्रमाणे’ महापौरांसमोरील ‘हौदात’ गोंधळ घातला. याच गोंधळाचा ‘ठरल्या’प्रमाणे फायदा घेत सत्ताधा-यांनी सभाकामकाज पूर्ण केले. वास्तविक, राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांची चर्चा करावी, अशी मागणी होती. संसदीय आयुधांचा वापर करुन सत्ताधा-यांना जेरीस आणावे, अशी त्यांची इच्छा होती. परंतु, तसे झाले नाही. राष्ट्रवादीत देखील दोन गट पडले आहेत. काही नगरसेवकांनी निषेधाचे फलक घातले नव्हते. तर, आंदोलन सुरु असताना महिला नगरसेविका जाग्यावर उभ्या राहिल्या होत्या. तर, अनेक अभ्यासू नगरसेवकांनी महासभेलाच दांडी मारली. त्यामुळे यातून राष्ट्रवादीतील गटबाजी देखील चव्हाट्यावर आली आहे.

विरोधकांनी संसदीय आयुधांचा वापर करुन चर्चा घडविणे अपेक्षित होते. चर्चेचा आग्रह धरायला हवा होता. सत्ताधा-यांना जेरीस आणून विषय मागे घ्यायला भाग पाडायला पाहिजे होते, असे सत्ताधारी भाजपच्याच काही नगरसेवकांनी पत्रकारांशी खासगीत बोलून दाखविले. विरोधी पक्षातील काही नगरसेवक आणि सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवक मिळून ‘तू मारल्यासारखे कर आणि आम्ही रडल्यासारखे करतो’ याप्रमाणे कामकाज करत असल्याची जोरदार चर्चा पालिकेच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  • भाजपने सभागृहात चर्चा न करता लोकशाहीचा गळा घोटला
    ”संतपीठ, भोसरीतील रुग्णालयाचे खासगीकरण हे विषय महत्वाचे होते. याविषयावर साधक-बाधक चर्चा होणे अपेक्षित होते. परंतु, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला आणि भाजपने गोंधळात महत्वाचे विषय केवळ दोन मिनिटात विनाचर्चा मंजूर केले. त्यामुळे हे सर्व नियोजनबद्ध असल्याचा संशय” शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी व्यक्त केला. तर, ”भाजपने सभागृहात चर्चा न करता लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करत भोसरीतील रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा” मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी दिला.

…ते ‘रेकॉर्डिंग’ आयुक्तांना देणार
दरम्यान, सभा कामकाज संपल्यानंतर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी संत पीठातील ‘रिंग’ संदर्भातील ठेकेदारांचे संभाषण पत्रकारांना ऐकविले. त्यामध्ये तीन ठेकेदारांनी मिळून रिंग केल्याचे ठेकेदारांनी मान्य केल्याचा दावा साने यांनी केला आहे. ‘रेकॉर्डिंग’ आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.