Pimpri: गाव, बेस्ट सिटी ते स्मार्ट सिटीच्या प्रवासाचा साक्षीदार सेवानिवृत्त

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे सेवानिवृत्त

एमपीसी न्यूज – इतर गावगाड्याप्रमाणे असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराचा मागील काही वर्षात विकास झाला. अनेक गावांचा समावेश करून आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत नगरपालिका आणि नगरपालिकेची पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापन झाली. शहाराला बेस्ट सिटीचा पुरस्कार मिळाला आणि आता शहराचा स्मार्ट सिटीत समावेश देखील झाला. शहराचा हा सर्व प्रवास प्रशासनात राहून पाहिलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे आज (शुक्रवारी) ते निवृत्त झाले. यानिमित्ताने त्यांनी त्यांच्या या प्रवासावर प्रकाश टाकला.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे निवृत्त झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत 1984 पासून आरोग्य विभाग समन्वयक पदावरून त्यांची सेवा सुरु झाली. समन्वयक ते अतिरिक्त आयुक्‍त असा त्यांचा एकूण प्रवास राहिला आहे. या प्रवासात त्यांनी सर्वच विभागांमध्ये प्रमुख म्हणून काम केले आहे.

  • ‘गाव ते स्मार्ट सिटी’ असे पिंपरी-चिंचवड शहराचे विविध टप्पे त्यांनी अनुभवले आहेत. तब्बल 21 आयुक्‍तांसोबत काम करण्याचा त्यांना मोठा अनुभव आला. प्रशासकीय सेवेत असताना अनेकदा नागरिकांच्या रोषाला देखील त्यांना सामोरे जावे लागले. चार वेळा तर जिवावर बेतणारे प्रसंगही त्यांच्यावर आले.

गावडे यांनी तब्बल 21 आयुक्तांसोबत काम केले. आयुक्तांसोबतच्या कामाचा अनुभव सांगताना गावडे म्हणतात, “प्रत्येक आयुक्‍तांनी आपापल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. हरनामसिंग यांनी हरित शहरासह सुरवातीच्या काळात शहरातील रस्ते विकासावर भर दिला. 2004 नंतर थेट आयएस अधिकारी शहरास आयुक्‍त म्हणून येऊ लागले. त्यानंतर शहराच्या विकासाला गती मिळाली. ‘स्मार्ट सिटी’ कडे वाटचाल करत असताना पदपथ आणि रस्ते मोकळे असायला हवेत. मात्र, ते करत असताना फेरीवाल्यांवरही अन्याय होता कामा नये. शहरातील पार्किंगची आरक्षणेही विकसित झाली पाहिजेत. तसेच नागरिकांनाही पार्किंग कुठे करावे आणि कुठे करू नये, याचे भान ठेवायला हवे.”

पूर्वी पिंपरी गावातून काळेवाडीला जायचे असले. तर, बोटीतून जावे लागत असे. पवना नदीवर पूल बांधला आणि पिंपरी-काळेवाडी या दोन गावात वाहतूक, दळणवळण वाढले. गावांचा विस्तार झाला. नागरी वस्ती वाढू लागली. त्यानंतर स्थापन झालेल्या महापालिकेचे काम अगदी छोट्या इमारतीमधून चालायचे.

  • सध्याचा दापोडी-निगडी मार्ग एक बस जाईल इतकाच होता. रस्त्यावरून एखादी सायकल जरी गेली तरी धूळ उडायची. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. शहराच्या विकासात प्रत्येक अधिकारी आणि कर्मचा-याचे मोठे योगदान आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. सुरुवातील महापालिकेकडे अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवण्यासाठी सक्षम यंत्रणा नव्हती. त्यामुळे अनधिकृत बांधकामे वाढण्यास जेवढे प्रशासन तेवढेच नागरिकही त्याला जबाबदार आहेत. पिंपरी-चिंचवड शहराची सर्वत्र कामगारनगरी म्हणून ओळख आहे.

  • इथे राज्य आणि देशभरातून आलेल्यांना काम मिळाले. मात्र, राहण्यासाठी परवडणारी घरे मिळाली नाहीत. त्यामुळे झोपडपट्ट्या निर्माण झाल्या. महापालिकेने जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मध्यंतरी नावलौकिक मिळवला. त्यामुळे महापालिकेकडे पैशांची कमी नव्हती. महापालिकेने झोपडपट्ट्यांमध्येही चांगल्या सुविधा पुरवल्या. याचे आज समाधान वाटत आहे, अशा अनेक आठवणी गावडे यांनी सांगितल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.