Pimpri : लम्पी पार्श्वभूमीवर 9 दिवसात शहरातील 55% जनावरांचे लसीकरण

एमपीसी न्यूज – लम्पीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी (Pimpri) महापालिकेच्या वतीने विशेष पथकांद्वारे लसीकरण, उपचार, पशुपालकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्यात आली असून शहरातील 55 टक्के जनावरांचे लसीकरण 9 दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांतच शहरातील 100 टक्के जनावरांचे लसीकरण पुर्ण करण्याचे उद्दिष्ट्य महापालिकेने निश्चित केले आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.

लम्पी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने राज्य पशुसंवर्धन विभागाकडून गोटपॉक्स लसीचे 3 हजार 400 डोस उपलब्ध करून घेतले असून आणखी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. सध्या लसीकरण प्रक्रिया जलद गतीने सुरु असून 2440 जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात गाय व बैलांमध्ये लम्पी त्वचा आजाराचा प्रसार होत असल्याचे दिसून आले होते.

प्रामुख्याने गायींमध्ये या आजाराचा प्रसार होत असून हा प्रादुर्भाव रोखण्याकरिता महापालिकेच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करणे व बाधित जनावरांना वेळोवेळी उपचाराच्या सुविधा देण्याच्या अनुषंगाने 30 ऑगस्ट रोजी पशुवैद्यकीय पथकांची नेमणूक करण्यात आली असून शहरातील विविध भागात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली आहे.

महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने तीन पथकांची (Pimpri) नेमणूक केली असून प्रत्येक पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी, मदतनीस आणि एक पशुधन पर्यवेक्षकांचा समावेश आहे. या पथकांद्वारे महापालिकेच्या आठ विभागीय क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण दक्षता घेण्यात येत आहे. भटक्या जनावरांमध्ये लम्पी संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने विलगीकरण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.

Pune : अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये होणार सर्वांत मोठे मराठी जनांचे संमेलन

लम्पी आजाराचा प्रसार चिलटे, डास यांसारख्या किटकांमुळे होत असल्याने प्रतिबंधक उपाय म्हणून जनावरांच्या गोठ्यांचे धुरीकरण व फवारणी करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने आतापर्यंत एकूण 443 गोठ्यांची फवारणी करण्यात आली आहे, अशी माहिती उप आयुक्त संदिप खोत यांनी दिली आहे.

तसेच जनावरांमध्ये लम्पी आजाराची लक्षणे आढळल्यास त्यांचे विलगीकरण करण्यात यावे आणि समन्वयकांशी संपर्क साधून पशुवैद्यकीय विभागाचे नियुक्त पथकांमार्फत उपचार करून घेण्यात यावे. गोठे मालकांनी आपल्या नजीकच्या आरोग्य कार्यालय किंवा पशुवैद्यकीय विभागाचे पथक समनव्यक यांच्याशी संपर्क साधून धुरीकरण व फवारणी करून घ्यावी, असे आवाहनही उप आयुक्त खोत यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.