Pimpri: आम्ही तुमच्यासोबत आहोत; ‘वायसीएमएच’मधील कोरोना योद्धयांचा पोलिसांकडून सत्कार

एमपीसी न्यूज – आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाची लढाई लढणाऱ्या, कोविड रुग्णांची सेवा करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर, नर्सचा पोलिसांनी आज (गुरुवारी)  सत्कार केला. केक कापून कोरोना रुग्णांच्या   सेवेबाबत त्यांचे आभार मानले.  ‘आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत’, असा विश्वास देत सर्वांचे मनोबल वाढविले व आत्मविश्वास दिला.

वायसीएम रुग्णालय आणि  जिल्हा रुग्णालय औंध येथेही हा कार्यक्रम घेण्यात आला. तिथल्या डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, आया या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, वायसीएमचे डॉ. विनायक पाटील, डॉ. किशोर खिलारे, डॉ. चिराग शहा, नर्स मेघा सुर्वे, पंचशीला कांबळे आदी उपस्थित होते.

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. राज्यातील पहिला रुग्ण शहरात आढळला होता. 10 मार्च 2020 रोजी पहिल्या दिवशी कोरोनाचे तीन रुग्ण आढळले होते.

10 मार्च ते 14 मे या 64 दिवसात शहरातील 183 आणि शहराबाहेरील 20 अशा 203 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व रुग्णांची महापालिकेचे डॉक्टर, नर्स मनोभावे सेवा करत आहेत. कोरोनावर कोणतेही ठोस औषध निर्माण झाले नसताना रूग्णांवर उपचार करतात. त्यांना दिलासा देतात.

आजपर्यंत 116 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, नर्स यांचा पिंपरी- चिंचवड पोलिसांनी वायसीएम रुग्णालयात जाऊन सत्कार केला. केक कापून आभार मानले. आम्हाला तुमचा अभिमान आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिला.

अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन  आहे. याकाळात सगळे घरी आहेत. मात्र पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी नित्यनेमाने आपली सेवा देत आहेत. खऱ्या अर्थाने हे सर्वजण कोरोना योद्धा आहेत.

दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई  यांनी आज आदित्य बिर्ला रुग्णालय, वाकड येथे जावुन तेथील डॉक्टर, नर्स व रुग्णालयातील इतर कर्मचा-यांचा कोविड रुग्णांची करत असलेल्या सेवेबद्दल पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे वतीने सत्कार केला व आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.