Pimpri : अजितदादांचे शहराकडे दुर्लक्ष म्हणावे की भाजपच्या कारभाराकडे ‘कानाडोळा’ ?

ना प्रलंबित प्रश्नांचा आढावा, ना आयुक्तांची बदली

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – बारामतीपेक्षा पिंपरी-चिंचवडवर आपले अधिक प्रेम असल्याचे सातत्याने सांगणारे अजित पवार उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री होऊन दोन महिने झाले तरीदेखील पिंपरी-चिंचवड शहरात फिरकले नाहीत. ना शहरातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला, ना विरोधात असताना महापालिकेतील भाजपच्या कारभारावर केलेल्या आरोपांची खातरजमा, चौकशी केली. आयुक्त श्रावण हर्डीकर भाजपला अनुकुल अशी भूमिका घेत असल्याचा त्यांनी स्वतः आरोप करून देखील हर्डीकर यांची बदली केली नाही. त्यामुळे अजितदादांनी शहराकडे दुर्लक्ष केले की भाजपच्या कारभाराकडे कानाडोळा करत आहेत ? याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू झाली आहे. तर, भाजपचे नाराज असलेले नगरसेवक, कार्यकर्ते सुद्धा अजितदादा एवढे शांत का आहेत, असा प्रश्न खासगीत विचारत आहेत.

महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार आणि आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारी शिवसेना देखील आता अचानक शांत झाल्याने त्यांच्या भूमिकेविषयी संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी राज्यात सत्तेत नसताना अजित पवार शहरात आल्यानंतर भाजपच्या महापालिकेतील कारभारावर हल्लाबोल करत. आमदारद्वियांनी शहर वाटून घेतले आहे. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असल्याचे आरोप अजितदादांनी केले.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतले. सनदी अधिकारी असूनही भाजपची बाजू घेतात, पक्षपातीपण कसा करू शकतात, असा सवाल केला होता. मात्र, राज्यात सत्तेत येताच आयुक्तांबद्दलची भूमिका बदलली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपचे घरगडी, प्रवक्ते, दलाल अशी शेलकी विशेषणे आयुक्तांना दिली. आता नगरसेवकांची भूमिका बदलली असून आयुक्त चांगले आहेत. आमचे घरगडी होणार आहेत असे जाहीरपणे राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत.

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने महापालिकेतील अनेक कामांच्या चौकशा लावल्या होत्या. भाजप पदाधिका-यांनी मागणी केल्यानंतर राज्य सरकार चौकशीचे आदेश देत होते. त्यामुळे अनेक चौकशा झाल्या. त्याचा फटका राष्ट्रवादीला महापालिका निवडणुकीत बसला आणि सत्ता गेली. आता राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आहे.

राष्ट्रवादीने महापालिकेतील भाजपवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले आहेत. या आरोपांची चौकशी करणे, त्याचा सोक्षमोक्ष लावणे राष्ट्रवादीचे कर्तव्य आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार, स्मार्ट सिटीतील अनागोंदी कारभार, निविदा रद्द झाल्या तरी देखील संचालक चकार शब्द काढत नाहीत. संचालकांना ‘अर्थपुर्ण मॅनेज’ केल्याची ‘वंदता’ आहे. राष्ट्रवादीच्या आमदाराने महापालिकेतील कारभारावर तर शब्द सुद्धा काढला नाही.

शिवसेना खासदार, जिल्हाप्रमुखांनी देखील महापालिकेतील रस्ते विकासात 90 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, टीडीआरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे आरोप केले होते. आयुक्त निष्क्रिय, भाजप धार्जिणे असल्याचे आरोप करत त्यांच्या बदलीची मागणी करणारे शिवसेनेचे नेते आता अचानक शांत झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयीपण संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे भ्रष्टाराच्या आरोपांची चौकशी करुन जनतेसमोर सत्य आणण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, ”अजितदादांचे शहरावरील लक्ष कमी झाले नाही. पालकमंत्री या नात्याने महापालिकेतील चुकीची कामे त्यांनी थांबविली आहेत. आम्ही आरोप केलेल्या कामांची 100 टक्के चौकशी केली जाणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प तयार करण्यात दादा व्यस्त आहेत. पुढील महिन्यात ते शहरात येऊन प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेणार आहेत. विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी देखील करणार आहेत”.

शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर म्हणाले, ”महापालिकेतील भाजपच्या काळातील तीन वर्षातील कारभाराची चौकशी केली जाणार आहे. सत्य जनतेसमोर आणणार आहोत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतलेल्या ठेकेदारधार्जिणे निर्णयांची चौकशी करावी. अशी मागणी शिवसेना नेते, नगरविकास विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहोत. शहरातील प्रलंबित प्रश्न आणि चुकीच्या कामांची चौकशीकरण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लवकरच बैठक होणार आहे. त्यामध्ये वेस्ट टू एनर्जी, स्मार्ट सिटी, यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईची निविदा याचा तक्रार केली जाणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.