Pimpri: सत्ताधारी म्हणत आहेत,”प्रशासनाकडून आमच्यावर खोटे आरोप”…!

होर्डिंग हटविण्याच्या ठेक्याशी भाजपच्या कोणत्याही पदाधिका-याचा संबंध नाही - जगताप

एमपीसी न्यूज – शहरातील अनधिकृत होर्डिंग हटविण्याच्या ठेक्याशी भाजपाच्या कोणत्याही पदाधिका-याचा संबंध नाही. तसेच होर्डिंग हटविण्याचा खर्च संबंधित होर्डिंगवाल्यांकडून वसूल करण्यात येणार आहे.त्यामुळे याबाबत पूर्ण माहिती घेऊन विरोधकांनी शहानिशा करावी. जेणेकरून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’  होईल. महापालिकेतर्फे अनधिकृत होर्डिंग हटविण्यात येत असल्याने अशा होर्डिंगवाल्यांची आणि फुकट्या जाहिरातदारांची दुकानदारी बंद झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपवर बेछुट आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत. आरोप न करता सबळ पुरावे सादर करावेत, असे आवाहन भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,शहरातील अनधिकृत होर्डिंग हटविण्याबाबत महापालिका न्यायालयाच्या निर्देशानुसार धोरण राबवित आहे. होर्डिंग हटविण्यासाठी महापालिका प्रशासनाने रितसर कायदेशीर बाबींची पुर्तता करून निविदा प्रक्रिया राबवून त्याचा ठेका दिलेला आहे. यात सत्ताधारी म्हणून भाजपाचा कोणताही हस्तक्षेप नाही. भाजपाच्या कोणत्याही पदाधिका-याचा होर्डिंग हटविण्याच्या ठेक्याशी कोणताही संबंध नाही.

विरोधासाठी कोणताही मुद्दा नसल्याने विरोधकांकडून होर्डिंग हटविण्याच्या विषयाचे राजकारण करण्यात येत आहे.बिनबुडाचे आरोप करून शहरवासीयांचे लक्ष विचलीत करण्याचा विरोधकांचा हा अयशस्वी प्रयत्न आहे, शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांवर अनधिकृत होर्डिंगची समस्या आहे. या होर्डिंगमुळे शहराच्या सौंदर्यास बाधा पोहचत आहे. त्यासाठी हे होर्डिंग हटविणे आवश्यक आहे. त्याबाबत महापालिका धोरण राबवित असून कार्यवाही करीत आहे.

शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर घालणारे प्रकल्प राबविण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनधिकृत होर्डिंग हटविण्यात येत आहेत. अशा होर्डिंगमुळे शहराच्या सौंदर्यास बाधा पोहचत आहे. पुण्यात अशा होर्डिंगमुळे अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. वादळी पावसामुळे आपल्या शहरातील काही होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन खबरदारीची उपाययोजना म्हणून अनधिकृत होर्डिंग हटवित आहे. त्यामुळे अशा अनधिकृत होर्डिंगवाल्यांचे धाबे दणाणले आहे. अशा होर्डिंगवाल्यांची आणि फुकट्या जाहिरातदारांची दुकानदारी बंद झाल्याने त्यांच्याकडून काहूर माजविण्यात येत आहे. विरोधकांशी हातमिळवणी करून भाजपाविरोधात चुकीचा प्रचार करण्यात येत आहे. त्यासाठी बेछुट आणि बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत, असेही जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.