Pimpri: सर्व भाजी मंडई,आठवडी बाजार, मोशी बाजार समितीत भाजीपाला व फळे विक्रीस मंगळवारपर्यंत पूर्णत: प्रतिबंध

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना कोवीड 19 साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व भाजी मंडई ,आठवडी बाजार, मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला व फळे विक्रीस पूर्णत:प्रतिबंध करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. त्याची अंमलबजावणी उद्या (शनिवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून मंगळवार, 14 एप्रिलपर्यंत करण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व उपाययोजना करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र कोवीड 19 उपाययोजना नियम 2020 नुसार एखाद्या भौगोलिक क्षेत्रात साथरोगाचा उद्रेक/प्रादुर्भाव आढळल्यास महापालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.

साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 मधील तरतूदीनुसार भोसरी भाजीमंडई , चिखली भाजी मंडई, चिंचवड भाजी मंडई, आकुर्डी भाजी मंडई, पिंपरी भाजी मंडई, थेरगाव भाजी मंडई, वाकड भाजी मंडई, सर्व आठवडे बाजार, पिंपरी चिंचवड शहरातील हातगाड्या, कृषी उत्पन्न बाजार समिती, मोशी येथे भाजीपाला व फळे विक्रीसाठी पूर्णता प्रतिबंध करण्यात आला आहे. 11 एप्रिल 2020 रोजी सायंकाळ 6 वाजल्यापासून मंगळवार 14 एप्रिल 2020 रोजी रात्री बारा वाजेपर्यत हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

त्यानुसार या संबंधित परिसरातील पोलीस ठाण्याचे प्रमुख या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करतील व संपूर्ण शहरात कोणतीही भाजी मंडई किरकोळ भाज्या व फळे विक्री व आठवडे बाजार बंद राहतील याची खबरदारी घेतील, असेही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.