Pune : पुणे शहर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी नियोजन करा; महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आदेश 

एमपीसी न्यूज – केवळ स्वच्छ सर्वेक्षणसाठी नव्हे तर, पुणे शहर कायमस्वरूपी स्वच्छ कसे राहील, यादृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे, असे स्पष्ट आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.

पुणे महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२० संदर्भात असलेले सर्व निकषांवर करावयाच्या कामकाज बाबत मनपा सभासद, अधिकारी, कर्मचारी, नागरिक व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्था यांचे सर्वांचे सहभागाने करावयाची कामे व यातील एकूण मूल्यांकन आणि विविध शहरांचा सहभाग या संदर्भात माहिती दिली.

याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर सभासदांनी सहभाग घेऊन आपापल्या प्रभागातील स्वच्छता विषयक कामासंदर्भात विविध सूचना केल्या. याप्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, पक्षनेत्या, सुनीता वाडेकर, अश्विनी लांडगे, अतिरिक्त महापालिका आयुक्त शंतनू गोयल उपस्थित होते. सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार उपायुक्त माधव जगताप यांनी मानले.

सभासदांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करीत संबंधित विभागाचे वरिष्ठ खाते प्रमुख, उपायुक्त, सहमहापालिका आयुक्त, महापालिका सहाय्यक आयुक्त, सर्व विभागीय आरोग्य निरीक्षक यांची तातडीने आढावा बैठक घेण्याचे आदेशही मोहोळ यांनी प्रशासनाला दिले. प्रशासन, मनपा सभासद, पुणेकर, स्वयंसेवी संस्था व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांनी सर्व एकत्रित येऊन समन्वयाने पुणे शहर स्वच्छ राहण्याचे दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.