PM CARES Fund: पीएम केअर्स फंड ट्रस्टच्या वतीने पुणे शहराला 12 व्हेंटीलेटर्स प्राप्त

PM CARES Fund: Pune City receives 12 ventilators on behalf of PM CARES Fund Trust पहिल्या टप्प्यात 1340 व्हेंटीलेटरचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्राला 275 व्हेंटीलेटर्स मिळाले आहेत.

एमपीसी न्यूज – पीएम केअर्स फंड ट्रस्टच्या वतीने पुणे शहरासाठी पाठविलेले 12 व्हेटींलेटर्स आज (रविवारी) प्राप्त झाले. ही पहिल्या टप्प्यातील मदत असून या मदतीसाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत मृतांची संख्या आणखी कमी करण्यासाठी या व्हेटींलेटर्सचा उपयोग होईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे. 

सध्या हे सर्व 12 व्हेंटीलेटर्स ससून सर्वोपचार रुग्णालयात ठेवण्यात आले असून शहरातील विविध रुग्णालयांमधील व्हेंटीलेटर्सची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांचे वितरण करण्यात येईल, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले. पीएम केअर्स फंडाकडून ही पहिल्या टप्प्यातील मदत शहराला प्राप्त झाली असून पुढे टप्प्या-टप्प्याने आणखी व्हेंटीलेटर्स प्राप्त होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मेड इन इंडिया व्हेंटीलेटर्स

पीएम केअर्स फंड ट्रस्टने Made in India अर्थात भारतात निर्मित होणाऱ्या 50 हजार व्हेंटीलेटरच्या पुरवठ्यासाठी 2000 कोटी रुपये निर्धारित केले असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सरकारी कोविड रुग्णालयांना  हे व्हेंटीलेटर पुरवण्यात येणार आहेत. 

या 50 हजार व्हेंटीलेटरपैकी 30 हजार व्हेंटीलेटरची निर्मिती भारत इलेक्ट्रोनिक्समधे करण्यात येत आहे. उर्वरित 20 हजार व्हेंटीलेटर पैकी एग्वा हेल्थ केअर 10 हजार, एएमटीझेड बेसिक 5,650, एएमटीझेड हाय एन्ड 4 हजार, अलाईड मेडिकल 350 व्हेंटीलेटर तयार करत आहे.

आतापर्यंत 2923 व्हेंटीलेटरची निर्मिती झाली असून त्यापैकी 1340 व्हेंटीलेटरचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्राला 275, दिल्ली 275, गुजरात 175, बिहार 100, कर्नाटक 90, तर राजस्थानला 75 व्हेंटीलेटर पुरवण्यात आले. 2020 जून अखेरपर्यंत आणखी 14 हजार व्हेंटीलेटर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.