PMPML : 42 लाख प्रवाशांनी निवडला पीएमपी एसी बसचा प्रवास; तर साध्या बसकडे कानाडोळा

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) पुणेकरांची जीवनवाहिनी बनली आहे. पीएमपीएमएलकडून प्रवाशांना चांगल्या दर्जाची सुविधा दिली जात असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा बळकट होत आहे. पीएमपीच्या ताफ्यात आता एसी बसचाही समावेश झाला आहे. उन्हाळ्यात या बसमधून प्रवास करण्यास प्रवासी अधिक पसंती देतात. साध्या बसला प्रवाशांनी उन्हाळ्यात पाठ फिरवल्याचे दिसत आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत निगडी डेपोमधून धावलेल्या 15 हजार 775 एसी बसमधून तब्बल 42 लाख दोन हजार 19 प्रवाशांनी प्रवास केला आहे.

साध्या बसने प्रवास करण्यासाठी प्रवाशांचा कानाडोळा –

पीएमपीकडून प्रवाशांना सेवा देण्यासाठी साधी आणि इलेक्ट्रिक बस अशा दोन प्रकारच्या बसेस उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिक बस वातानुकुलीत (एसी) आहेत. एसीतून नागरिकांचा चांगला प्रवास होत आहे. पीएमपीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये नोकरदार वर्गासह मध्यमवर्गीय प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे. विद्यार्थी, कामगार, नोकरदार यांच्यासह सर्वच क्षेत्रातील आणि स्तरातील प्रवाशांची पीएमपीने प्रवास करण्यासाठी गर्दी होत असते. तुलनेत इलेक्ट्रिक बससेवा चांगली आणि आरामदायी असल्यामुळे नागरिकांकडून पीएमपीच्या साध्या बसने प्रवास करण्यास प्रवासी कानाडोळा करताना दिसत आहेत.


पीएमपीने प्रवाशांच्या सोयीसाठी एसी बससेवा सुरु केली आहे. त्यात स्वच्छता प्राधान्याने राखली जाते. तीकीतातील समानता, शांतता आणि एसी प्रवासासाठी अनेक प्रवासी एसी बसला पसंती देत आहेत.
-शांताराम वाघिरे, आगार व्यवस्थापक, निगडी


एसी बस आणि साध्या बसच्या गुणवत्तेमध्ये फरक – 

साध्या बसच्या अनेक गाडयांचे दरवाजाचे तुटलेले आहेत. दरवाजा बंद (PMPML) होताना किंवा उघडताना वारंवार जोर-जोरात आवाज येतो. या सर्वाचा वैताग म्हणून कि काय या बसगाडया रिकाम्या धावत असल्याचे दिसत आहे. अनेकदा साध्या बसने प्रवास करताना बसमध्ये 5 ते 7 प्रवासी दिसतात. ‘वाट पाहीन पण एसी बसने जाईन’, अशी भूमिका अनेक प्रवासी घेतात. एसी बसमध्ये गर्दी असली तरीही उभे राहून प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. परिणामी अनेक वेळा साधी बस रिकामी धावताना दिसते. उन्हाच्या झळा पुन्हा वाढू लागल्या असल्याने उन्हापासून बचाव म्हणूनही साध्या दरात एसी बसची सफर अनेक प्रवासी अनुभवतात.

महिनाबसप्रवासी
जानेवारी423811 लाख 52 हजार 711
फेब्रुवारी377010 लाख 11 हजार 689
मार्च38899 लाख 85 हजार 309
एप्रिल387810 लाख 52 हजार 310

दररोज हजारो प्रवाशांचा एसी प्रवास – PMPML

जानेवारी महिन्यात निगडी डेपोमधून दररोज सरासरी 137 एसी बसेस धावल्या. त्यातून दररोज 37 हजार 184 जणांनी प्रवास केला. फेब्रुवारी महिन्यात दररोज सरासरी 135 बसेस धावल्या. त्यातून दररोज 36 हजार 132 जणांनी प्रवास केला. मार्च महिन्यात दररोज सरासरी 125 बसेस धावल्या असून त्यातून 31 हजार 784 जणांनी दररोज प्रवास केला आहे. एप्रिल महिन्यात दररोज सरासरी 129 बसेस मधून 35 हजार 77 जणांनी प्रवास केला आहे.

म्हणून एसी बसला प्रतिसाद –

  • वातानुकुलीत प्रवास
  • आरामदायी प्रवास
  • धुळीपासून बचाव
  • बाहेरचा गोंगाट ऐकू येत नाही, परिणामी शांतता वाटते
  • एसी बसेसना एअर सस्पेन्शन चांगले असते
  • तुलनेत स्वच्छता अधिक असते
  • तिकीट दर समान असतो

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.