Pimpri : Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रत्यक्ष कारभाराचे नोटिफिकेशन जारी

आयुक्तालयाच्या हद्दीत अंतर्गत बदल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरासाठी नव्याने सुरु करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार येत्या 15 ऑगस्ट (बुधवार) पासून सुरु होणार आहे. त्याबाबतचे नोटिफिकेशन राज्य सरकारच्या गृहविभागाने आज (शुक्रवारी) काढले आहे. दरम्यान पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणा-या परिमंडळ हद्दीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी शासनाकडे सादर केला आहे.

28 मे 2018 रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे पोलीस आयुक्त पुणे शहर आणि पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून पिंपरी-चिंचवड महापालिका व परिसरासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यात आले आहे. या आयुक्तालयाचे प्रत्यक्ष कामकाज येत्या बुधवार (15 ऑगस्ट) पासून सुरु होणार आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनचे पोलीस उप आयुक्तांच्या कार्यालय इमारतीमधून आयुक्तालयाचा कारभार सुरु होणार आहे. तर कंट्रोल रूम पिंपरी पोलीस ठाण्यात असलेल्या जिमच्या जागेतून सुरु करण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी शासनाकडे पाठविला आहे. नव्या रचनेनुसार पोलीस उप आयुक्त विनायक ढाकणे यांची मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे गुन्हे, वाहतूक आणि प्रशासकीय प्रशासकीय भाग असण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे असलेला भार अधिक असल्याने आणखी एक पोलीस उपायुक्तांची गरज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चौथ्या पोलीस उपायुक्तांच्या जागेसाठी देखील वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात दोन परिमंडळ करण्यात आले आहेत. पूर्वीच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यकक्षेतील काही भाग बदलून नवीन रचना करण्यात आली आहे.
परिमंडळ एक –
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील
पोलीस स्टेशन – पिंपरी, चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, दिघी, आळंदी, चाकण आणि चिखली
परिमंडळ दोन –
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील
वाकड, हिंजवडी, सांगवी, देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, निगडी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.