Pune : बीआरटी स्थानकांचे दरवाजे सतत उघडे…!

'बीआरटी मार्गच्या देखभाल व दुरुस्ती कडे पीएमपीएलचे दुर्लक्ष तर पालिकेची चालढकल

एमपीसी न्यूज – शहरातील बीआरटी मार्गांची दुरावस्था रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘ देखभाल व दुरुस्ती समिती’च्या पाहणीत नगर रोड बीआरटी मार्गावर अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.  त्यामध्ये स्थानकावर बस दाखल झाल्यानंतर स्थानकाचा दरवाजा न उघडणे किंवा स्थानकाचे दरवाजे कायमच सताड उघडा राहत असल्याचे प्रकर्षाने दिसून आले होते. याबाबत पीएमपीएमएलने पालिकेला दुरुस्ती करण्याबाबत पत्र दिले आहे. मात्र पाच महिने उलटून देखील कोणतीही कारवाई न झाल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात अली आहे. 
शहरातील बीआरटी मार्गांची दुरावस्था रोखण्यासाठी ‘बीआरटी मार्ग देखभाल व दुरुस्ती समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. या समिती समवेत पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी 27 मार्चला नगर रोड बीआरटी मार्गाची पाहणी केली होती. त्यावेळी नगर रोड बीआरटी मार्गावर अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यावेळी गुंडे यांनी या त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याची सूचना केली होती. तसेच, त्याबाबत महापालिकेला लेखी कळविण्यात आले होते. त्यानंतर काही प्रमाणात दुरुस्तीचे काम करण्यात आले. मात्र, आता हे दरवाजे कायमच उघडे राहत असल्याचे दिसून येते.

याबाबत पीएमपी प्रशासनाने महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, अद्याप महापालिका प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तसेच, महापालिकेच्या दुटप्पी धोरणाचेही दर्शन यातून होत आहे. पीएमपी प्रवासी मंचाचे सदस्य संजय शितोळे यांनी याबाबत पीएमपी प्रशासनाकडे तक्रार केली असता, ‘आम्ही महापालिकेला कळविले आहे,’ एवढेच उत्तर देण्यात आले. त्यावर महापालिकेकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली असता, ‘तुम्हीच पाठपुरावा करा’ असा सल्लाही शितोळे यांना देण्यात आला.
महापालिका प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बीआरटी थांब्यांची दुरुस्ती होत नाही. तोपर्यंत पीएमपी प्रशासन या मार्गातून बस चालविणार नाही, अशी भूमिका पीएमपी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी शितोळे यांनी केली.
दरम्यान, थांब्याचे दरवाजे नादुरुस्त असल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाला सातत्याने कळविण्यात आले आहे, अशी माहिती पीएमपीचे उपव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.