Police Recruitment : पोलीस भरतीमधील गैर प्रकारांना बसणार आळा; पोलीस उचलणार ‘हे’ पाऊल

पिंपरी-चिंचवड शहरात उघड झाला होता कॉपीचा स्मार्ट प्रकार

एमपीसी न्यूज – गृह विभागात 23 हजार 628 पदे भरली जाणार (Police Recruitment )असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत एका लक्षवेधीचे उत्तर देताना सांगितले.

त्यामुळे पोलीस दलात भरती होऊ इच्छिणारे उमेदवार भरती जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, गृह विभागाने पोलीस भरती परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच तंत्रज्ञानाची मदत घेऊन होणारे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे.

गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंध नुसार (Police Recruitment)पदभरती केली जात होती. आता लोकसंख्यनुसार किती अंतरावर पोलिस स्टेशन, कर्मचारी, युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला असून याअंतर्गत 23 हजार 628 पोलिस शिपाई पदे भरली जाणार आहेत.

नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील दहा पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये 8 हजार 400 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याची क्षमता आहे. ही क्षमता दोन टप्प्यात 5 हजाराने वाढवली जाणार आहे. त्यामुळे पुढील काळात नव्याने भरती होणाऱ्या उमेदवारांचे प्रशिक्षण आणि सेवेत असलेल्या अंमलदारांचे प्रशिक्षण एकाच वेळी नियोजितपणे होऊ शकणार आहे.

पिंपरी-चिंचवड मध्ये उघड झाला होता कॉपीचा स्मार्ट प्रकार

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात सन 2019 च्या भरती प्रक्रियेत 720 पदांची भरती करण्यात आली. ही प्रक्रिया कोरोना साथीमुळे लांबणीवर पडली. सन 2021 मध्ये याची पूर्ण प्रक्रिया पार पडली. दरम्यान या परीक्षेत 50 उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात आले. पोलीस भरती प्रक्रियेत गैर प्रकार केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. लेखी परीक्षेत हिंजवडी येथे एका बहाद्दराने स्मार्टपणे कॉपी केल्याचे आढळून आले.

Kamshet : कामशेत येथील जुगार अड्ड्यावर छापा, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

मास्कमध्ये बॅटरी, सिमकार्ड, इअरफोन आणि अन्य साहित्य फिट करून उमेदवार परीक्षा केंद्रावर जात असताना तपासणीत पकडला गेला. त्याच्याबरोबर त्याच्या साथीदारांना देखील पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. निगडी पोलीस ठाण्यात देखील पोलीस भरतीत गैरव्यवहार केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कॉपी प्रकरणाच्या तपासात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी औरंगाबाद, जालना आणि बीड यासह राज्याच्या विविध भागातून सुमारे 80 जणांना अटक केली. त्यात पोलिसांनी 76 मोबाईल फोन, 66 इलेक्ट्रॉनिक स्पाय डिव्हाईस, 22 वॉकीटॉकी संच, 11 वॉकीटॉकी चार्जर, 11 लाख रुपये रोख रक्कम असे भलेमोठे घबाड जप्त केले. अटक केलेल्या आरोपींमधील 12 आरोपी भरती प्रक्रियेत एवढा घोटाळा करूनही नापास झाले होते.

पोलिसांकडून उपाययोजना

पोलीस शिपाई परीक्षा एजन्सीकडे दिली असून यात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जॅमर बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात येणार आहे. यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यामध्ये सोशल मीडिया साईट,गेम सॉफ्टवेअरचा अंतर्भाव केला जाणार आहे. सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना कोणत्याही प्रकारे गैरप्रकाराला वाव मिळणार नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.