Talegaon : गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर पोलिसांचे रूटमार्च

एमपीसी न्यूज – सध्या सुरु असलेला गणेश उत्सव दोन दिवसात समाप्त होत आहे. त्यामुळे शहरात सर्वच गणेश मंडळे गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढतात. विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि परिमंडळ दोनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी आज (मंगळवारी) शहरातून रूटमार्च केला.

पोलिसांच्या रूटमार्चमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा रूटमार्च सकाळी आकरा ते दुपारी एक या वेळेत करण्यात आला. यामध्ये 10 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 60 पोलीस कर्मचारी आणि एक एसआरपीएफ प्लाटून हजर होते.

तळेगाव दाभाडे शहरातील गणेश उत्सव बुधवारी (दि. 19) समाप्त होणार आहे. गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी सर्व मंडळे मिरवणूक काढतात. तसेच नागरिक देखील घरच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन घाटांवर, नदीकडे जातात. विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यावेळी कोणतीही अनुचित घटना किंवा प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन तत्पर असते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.