Chinchwad : सोशल मीडियावरील ‘आक्षेपार्ह पोस्टवर’ पोलिसांचा वॉच

एमपीसी न्यूज – दिल्ली येथील हिंसाचारातील काही चित्रफिती सध्या सोशल मीडियाद्वारे व्हायरल केल्या जात आहेत. यातून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्‍यता आहे. अशा चित्रफिती अवथा मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्‍तींवर पोलिसांचा वॉच आहे. ट्विटर, फेसबुक, व्हाट्सअप व अन्य सर्व सोशल साईटवर पोलिसांची करडी नजर आहे. सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणा-या पोस्ट निदर्शनास आल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडून सांगण्यात आले आहे.

दिल्ली येथील तणावपूर्ण स्थितीच्या चित्रफिती आणि भडकाऊ पोस्ट्‌स सध्या व्हॉटस्‌ऍप ग्रुप व फेसबुकवर व्हायरल होत आहेत. यामुळे धार्मिक भावना दुखावण्याची शक्‍यता असून त्यातून अन्य काही विघातक घटना घडू शकतात. यामुळे सायबर विभागाचे पोलीस सोशल मीडियावर दिवस-रात्र लक्ष ठेवून आहेत. आक्षेपार्ह पोस्ट दिसल्यास ती काढून टाकण्यात येत आहे. मात्र संबंधितांकडून असा वारंवार प्रयत्न झाल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकारास ग्रुप अॅडमिन आणि पोस्ट टाकणाऱ्या सदस्याला देखील जबाबदार धरले जाईल, असे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

आक्षेपार्ह पोस्टवर सायबर विभागाचे लक्ष आहे. याबाबत तक्रारी आल्यास पोलीस कारवाई करतील. मात्र जाणीवपूर्वक कोणी आक्षेपार्ह पोस्ट वारंवार टाकत असतील तर पोलीस स्वतःहून त्यावर कारवाई करीत प्रसंगी गुन्हा देखील दाखल करतील, असे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सुधाकर काटे म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत आपल्या शहरातील शांतता भंग होणार नाही, याची दक्षता प्रत्येक नागरिकाने घ्यावी. सोशल मीडियावर आमचे लक्ष आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील संदेशाची देवाण-घेवाण जबाबदारीने करावी. अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांना काही आक्षेपार्ह मजकूर, संदेश आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा.”

HB_POST_END_FTR-A2
You might also like