Pimpri: रावसाहेब दानवे यांनी आपली उंची बघून बोलावे – संजोग वाघेरे

राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसची लाट सुरु, समृध्दी महामार्गाचा गैरप्रकार भविष्यात बाहेर येणार

एमपीसी न्यूज – राज्याभरातील स्मार्ट सिटीची कामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या लोकांनाच मिळत आहेत. समृध्दी महामार्गाचे काम देखील नजीकच्या लोकांना दिले आहे. यामधील गैरप्रकार आगामी काळात बाहेर येणार असून मुख्यमंत्र्यांनाच भविष्यात अटक होईल. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा न्यायालयाने ठपका ठेवला आहे. त्यामुळे दानवे यांनी फडणवीस आणि बापट यांची काळजी करावी, असा टोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दानवे यांना लगावला आहे. तसेच राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसची लाट सुरु झाली आहे. त्यामुळे आमच्या नेत्याबाबत संभ्रम निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्ये केली जात आहेत, असेही ते म्हणाले.

सिंचन घोटाळ्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार जेलमध्ये जाणारच असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरूवारी (दि. 17) म्हटले होते. त्याला वाघेरे यांनी आज (शुक्रवारी) प्रतित्युत्तर दिले. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर मंगला कदम, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे उपस्थित होते.

यावेळी वाघेरे म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एसबीच्या चौकशीला सहकार्य करत आहेत. पंरतु, आमच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे हे अजितदादा जेलमध्ये जाणार असे वारंवार म्हणत आहेत. दानवे यांनी आपली राजकीय उंची बघून बोलावे. राज्यातील सर्व शहरामधील स्मार्ट सिटी, समृध्दी महामार्गाच्या कामाची निविदा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याच लोकांना दिल्या आहेत. त्यामुळे यातील गैरप्रकाराबद्दल भविष्यात मुख्यमंत्र्यांनाच अटक होईल.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा ठपका न्यायालयाने शुक्रवारी ठेवला आहे. त्यामुळे दानवे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री बापट यांचीच काळजी करावी, असा टोला वाघेरे यांनी लगावला आहे.

  • मावळमध्ये राष्ट्रवादीचाच खासदार होणार!
    मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार असो किंवा अन्य कोणताही उमेदवार असो, या मतदारसंघाचा आगामी खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच खासदार होणार आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराची भाजपसह शिवसेनेला धास्ती आहे. म्हणूनच युतीसाठी स्थानिक नेते आग्रही आहेत. तसेच संसदरत्न असलेल्या खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल असे बोलणे चुकीचे आहे, असेही वाघेरे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.