Chikhali News : ‘सायकलवारी गडकोटांवरी’, 5 दिवसात 6 गडांची सफर ; पीटी शिक्षकाचा सोलो उपक्रम

एमपीसी न्यूज – दिवाळीला ‘सायकलवारी गडकोटांवरी’ हा सोलो उपक्रम एक पीटी शिक्षक गेली तीन वर्षापासून सातत्याने राबवित आहे. केशव प्रभाकर अरगडे असे या अवलिया शिक्षकाचे नाव आहे. साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ते शारीरिक शिक्षणाचे शिक्षक आहेत. यावर्षी त्यांनी सायकलवरून 5 दिवसांत 6 गडांची सफर पूर्ण केली आहे.

केशव अरगडे यांनी 30 ऑक्टोबरला चिखली येथून आपल्या मोहिमेला सुरूवात केली, सर्वप्रथम त्यांनी सिंहगड सर केला. तिथे नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते गडउतार झाले. त्यानंतर वेल्हे गावातील तोरणा किल्ल्याचा पायथा गाठला, त्याच दिवशी सायंकाळी ते गडमाथ्यावर पोहचले यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी मंगेश भालेराव होते.

31 ऑक्टोबरला गडावरील मेंगाई मातेचे दर्शन करून त्यांनी क्षेत्र राजगड पर्यंत सायकल प्रवास केला. दुपारी पाली दरवाजा राजमार्गाने गड माथा गाठला. 1 नोव्हेंबरला गडावरील पद्मावती देवीच्या मंदिरात वसुबारस निमित्त सालाबादप्रमाणे दीपोत्सव साजरा केला. यावेळी त्यांचे मित्र राजेश भोसले हे गडावर उपस्थित होते. यानंतर गड उतरून पुन्हा भोर कडे मार्गक्रमण केले.

पुढील दोन दिवसांत त्यांनी श्री क्षेत्र केंजळगड व श्री क्षेत्र रायरेश्वर गडमाथा गाठला. श्री क्षेत्र रायरेश्वर येथे रायरेश्वराचे दर्शन व पूजा केली. त्यानंतर पुन्हा भोर गाठून येथे मुक्काम केला. नंतर पहाटे श्री क्षेत्र रोहिडा गडाकडे प्रस्थान केले. श्री रोहिडा येथील दुर्ग संवर्धनाची दुरावस्था झालेली पाहून त्यांचे मन खिन्न झाले. रोहिडेश्वराचे दर्शन घेऊन त्यांनी परतीचा मार्ग धरला. जवळपास 350 तास सायकलवारी करत अरगडे यांनी 5 दिवसांत 6 गडांची सफर केली.

पुढच्या मोहिमेत त्यांनी सागरी गडकोट मोहीम सुरू केली. यामध्ये त्यांनी श्री क्षेत्र टाळगाव चिखली ते वसई-विरार असा जवळपास 200 किमी प्रवास पूर्ण केला. या प्रवासादरम्यान त्यांनी श्री क्षेत्र महड, श्री क्षेत्र वसई किल्ला, श्री क्षेत्र वज्रगड, नरवीर चिमाजी आप्पा स्मारक या स्थळांना भेट दिली.

या दोन्ही मोहीमेत त्यांनी आपल्या सायकलवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची पाटी लावली होती. यामध्ये महाराजांनी गडांवर केलेले पाण्याचे नियोजन, सर्व जातींमधील लोकांना एकत्रित करुन स्थापन केलेले स्वराज्य, अंधश्रद्धा निर्मूलन असे विविध संदेश या पाटीवर होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.