Pune : 11 व्या तालचक्र महोत्सवाला दिमाखात प्रारंभ

एमपीसी न्यूज – युवा वादकांचे दमदार (Pune) तबलावादन आणि कंठ संगीतातील आश्वासक सादरीकरणाने 11 व्या ‘तालचक्र महोत्सवा’ला शुक्रवारी लयदार प्रारंभ झाला. उद्घाटनाच्या सत्रात युवा तबलावादक सागर पटोकार आणि रोहित ठाकूर यांनी ढंगदार वादनाने वातावरणनिर्मिती केली तर सुरंजन खंडाळकर आणि शरयू दाते या युवा गायकांनी त्या वातावरणाला सुरेलतेची जोड दिली.

पंडित विजय घाटे व पुनीत बालन समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘तालचक्र महोत्सवा’चे पहिले सत्र शुक्रवारी सायंकाळी संपन्न झाले. तालवाद्यांना केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात येणारा एक महत्त्वाचा संगीत महोत्सव म्हणून अशी ओळख असलेल्या या महोत्सवाचे हे 11 वे वर्ष आहे.

तीन दिवसीय महोत्सवातील पहिल्या दिवसाचे कार्यक्रम मयूर कॉलनी येथील बालशिक्षण सभागृहात सायंकाळी सुरू झाले. महोत्सव आयोजक पं. विजय घाटे, डॉ. हेमंत अभ्यंकर आणि चंदुकाका सराफ अॅंड सन्सच्या विपणन प्रमुख वैष्णवी ताम्हाणे (Pune) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विदुषी देवकी पंडित यावेळी उपस्थित होत्या.

युवा तबला वादक आणि पं. विजय घाटे यांचे शिष्य सागर पटोकार आणि रोहित ठाकूर यांच्या तबला सहवादनाने पहिल्या सत्राची सुरवात झाली. त्यांनी तीन तालाचे बहारदार सादरीकरण केले.

पेशकार, कायदा, रेला आणि बंदिशी अशा क्रमाने त्यांनी प्रस्तुतीकरण केले. तसेच तिस्र आणि चतुस्र जातीत फारुखाबाद, पंजाब घराण्याच्या पारंपरिक बंदिशी तयारीने सादर करीत उपस्थितांची दाद मिळविली. बनारस घराण्याची बंदिश सादर करीत त्यांनी आपल्या सहवादनाला विराम दिला. अभिषेक शिनकर यांनी संवादिनीवर पूरक साथ केली.

तालचक्रच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सुरंजन खंडाळकर आणि शरयू दाते यांचा ‘सूर सुरंजन’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये त्यांनी मराठी भावगीते, नाट्यगीत, गझल आणि अभंग सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ‘तेजोमय नादब्रह्म हे…’ या सुरेश वाडकर यांनी गायलेल्या गीताने त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली.

Pimpri – प्रसाद सस्ते आणि समाधान दगडे यांची महाराष्ट्र केसरी साठी निवड

यानंतर उस्ताद गुलाम अली यांची ‘बरसन लागी…’ ही ठुमरी त्यांनी गायली. ‘मी राधिका…’, ‘पाहिले न मी तुला…’, ‘मी मज हरखून बसले गं…’ या त्यांनी सादर केलेल्या मराठी गीतांना उपस्थितांनी दाद दिली. ‘हम ही मैं न थी कोई बात…’ ही मेहेंदी हसन यांची गझल त्यांनी सादर केली.

सुरंजन खंडाळकर यांनी आपले वडील पंडित रघुनंदन खंडाळकर यांची ‘राधे देव बासुरी मोरी…’ ही रचना सादर करीत आपल्या सादरीकरणाचा आणि महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप केला. त्यांना अभिजित भदे (ड्रम्स), श्रुती भावे (व्हायोलिन), पांडुरंग पवार (तबला), रोहित कुलकर्णी (की बोर्ड), शुभम उगले (पखावज) यांनी साथसंगत केली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

यावर्षी महोत्सवासाठी चंदुकाका सराफ अँड सन्स, व्यंकटेश बिल्डकॉन, लोकमान्य मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी, सुहाना मसाले, बँक ऑफ महाराष्ट्र, गिरीकंद ट्रॅव्हल्स, ओर्लीकॉन बाल्झर, विलो यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.