Pune : मोदी सरकार बदलण्यात कुचराई नको: ‘मतदार जागृती परिषद’ सभेतील सूर

एमपीसी न्यूज- सर्व आघाड्यांवर अपयशी झालेले मोदी सरकार बदलण्यात कुचराई नको, असा सूर ‘मतदार जागृती परिषद’ या मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान ‘ विषयावर झालेल्या मतदार जागृती परिषद सभेत उमटला.

सभेच्या सध्यक्षस्थानी युवक क्रांती दलाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड, बिशप थॉमस ढाबरे, डॉ.कुमार सप्तर्षी, मनीषा गुप्ते, मौलाना निजामुद्दीन सहभागी झाले होते.

बिशप थॉमस ढाबरे म्हणाले, “मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण प्रथम आणि शेवटी ही भारतीय आहोत. सामाजिक क्रांती, स्वातंत्र्यलढयात ख्रिस्ती बांधवांचे योगदान आहे. तसेे सर्वच अल्पसंख्यकांचे आहे. राष्ट्र् सर्वांचे आहे आणि निरपेक्ष आहे. धर्मावरुन भेदभाव होता कामा नये. राष्ट्रवादाच्या नावाखाली देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण होता कामा नये”

तीस्ता सेटलवाड म्हणाल्या, ” देशातील वातावरण बदलण्याचा प्रयत्न होत आहे. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होऊ दिली जात नाही, केवळ सत्ताधारी पक्षाला हव्या त्याच मुद्दयांवर चर्चा घडवली जात आहे. त्यात माध्यमेही मागे नाहीत. भय आणि संभ्रमाचे वातावरण तयार केले जात आहे. सीआरपीएफ सैनिकांना जे सुरक्षित ठेवू शकले नाहीत, तेच त्याबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना देशद्रोही ठरवत आहेत. माहिती अधिकारासह काँग्रेस आघाडी सरकारने केलेले जनहिताचे कायदे कमजोर करण्याचे काम संघप्रणित भाजपा सरकारने केले. संविधान धोक्यात आहे. लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.’ या सरकारने भयग्रस्त वातावरण निर्माण केले आहे. मजूर, शेतकरी, बेरोजगारीचे प्रश्न संपले नाहीत. मागील दहा वर्षात जे लोकशाहीवादी कायदे बनले, ते कमकुवत करण्याचे, रद्द करण्याचे काम या सरकारने केले आहे ”

मनीषा गुप्ते म्हणाल्या, “धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद ही मूल्ये धोक्यात आहेत.फॅसिझमची लक्षणे दिसत आहेत. हे सरकार धर्माधिष्ठीत संघाचे आहे. मनूवादी हिंदूराष्ट्र त्यांना आणायचे आहे. लोकशाही सुदृढ करण्यासाठीच आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत”

मौलाना निझामुद्दीन म्हणाले, “मताच्या माध्यमातून सरकार बदलण्याच्या कामात आपण कुचराई करता कामा नये. मल्ल्या, चोकसी पळवून लावणारा, राफेल फाईल गहाळ करणारा, पत्नीची काळजी न करणारा, जो असताना गांधींच्या प्रतिमेवर गोळया चालवल्या जातात, वेमुलाची आत्महत्या होते, अशा चौकीदाराची देशाला गरज नाही”

अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले.”दुसऱ्या पक्षाचे उमेदवार पळवले जात आहेत, असे या निवडणुकीचे वातावरण आहे. मोदी हे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलें. मोदींनी अर्थव्यवस्थेची वाट लावली. इतर पक्षाला दिलेले मत भाजपला जाते, हे गंभीर नाही. भाजपला दिलेले मत संघाला जाते, हे गंभीर आहे. बहुमत मिळणार नव्हते म्हणून युद्धज्वर तयार करण्यात आला. संविधान पूर्व भारत त्यांना हवा आहे. आपण संविधानानंतरच्या भारताचा आग्रह धरला पाहिजे. डॉ. प्रकाश आंबेडकर हे संभ्रमाचे वातावरण तयार करुन भाजपला मदत करीत आहेत. त्यापेक्षा भाजपला उघड सामील झालेले आठवले जास्त बरे. घोषित आणीबाणी विरुद्ध लढल्यानंतर ४२ वर्षांनी अघोषित आणीबाणी विरुध्द लढण्याची वेळ आली आहे. इथली लोकशाही जिवंत राहावी, विचारवंत जिवंत राहावेत, विचार जागृत राहावेत यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यरत राहण्याची गरज आहे. हे मतदार जागृती ध्येय यशस्वी केले पाहिजे” असे कुमार सप्तर्षी म्हणाले.

‘जात आणि आपण’ , ‘हिंदू आणि हिंदुत्व’, ‘कोणीही चालेल, भाजप नको’ या डॉ.कुमार सप्तर्षी लिखित पुस्तिकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रशांत कोठडिया यांनी प्रास्ताविक केले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.