Pune : लष्करी भागातील जागेचा महामेट्रोला ताबा

एमपीसी न्यूज- शहरातील मेट्रोचे काम गतीने सुरू आहे. मात्र, पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या क्रमांक 1 मधील खडकी ते रेंजहिल्स दरम्यानच्या लष्करी भागातील जागा मेट्रोच्या ताब्यात येणे बाकी होते. यामुळे काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. मात्र, गुरुवारी संरक्षण खात्याने ही जागा महामेट्रोला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

मेट्रोच्या बांधकामातील महत्त्वाच्या असणाऱ्या मेट्रोच्या स्टेशन आणि डेपोसाठी आवश्यक असलेल्या स्वारगेट आणि कोथरूड कचरा डेपोच्या जागांचा यात समावेश आहे. सुमारे 35 एकर जागा महामेट्रोच्या ताब्यात सध्या आली असून, यापैकी अनेक ठिकाणी मेट्रोच्या कामांना सुरुवात झालेली आहे. यातील कोथरूड कचरा डेपो येथील 12.11 हेक्टर जागा महामेट्रोला मेट्रो डेपोसाठी मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गामधील येणा-या लष्करी भागातील 10 एकर जागा ताब्यात येणे बाकी होते. त्याबाबत महामेट्रोकडून संरक्षण खात्याकडे पाठपुरावा सुरू होता. आता संरक्षण खात्याने ही जमीन महामेट्रोला हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. खडकी ते रेंजहिल्स या दरम्यान मेट्रोमार्ग, मेट्रोचे स्टेशन्स, पार्किंग यासाठी ही जागा वापरण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.