Pune : प्रत्येक प्रभाग कार्यालयात मतदान केंद्राची माहिती देण्याची व्यवस्था करा – जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pune) शहरातील मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी प्रत्येक प्रभाग कार्यालयात ‘तुमच्या मतदान केंद्राविषयी जाणून घ्या’ कक्ष स्थापन करावा. विविध माध्यमाद्वारे मतदारांना मतदान सुविधेबाबत माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसंबंधी कामासाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि समन्वयक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला मावळ निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, शिरूर निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

Pune : पुणे शहर विद्रुपीकरण्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीव्र आंदोलन

डॉ.दिवसे म्हणाले, मतदारांना माहिती देण्यासाठी महानगरपालिकेच्या ‘स्मार्ट सारथी’ प्रणालीचा उपयोग करण्याबाबत विचार करावा. मतदान केंद्रस्तरावर जनजागृती पथक स्थापन करण्याची कार्यवाही करावी. निवडणूक संवाद (Pune) आराखडा तयार करतांना दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधांचा विचार करावा. मतदानाच्या एक दिवस आधीपासून नियंत्रण कक्षात पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ नियुक्त करावे.

निवडणुकीच्या सर्व जबाबदाऱ्या अत्यंत गांभीर्याने आणि लक्षपूर्वक पार पाडाव्यात. विविध अधिकाऱ्यांशी समन्वय साधून निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. निवडणूक कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करावा. मतदार नोंदणी करतांना संबंधित व्यक्ती दिलेल्या पत्त्यावर राहात असल्याची खात्री करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखड्याच्या अंमलबजावणी बाबत चर्चा करण्यात आली. बैठकीला सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, विविध विषयांचे समन्वयक अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.