Pune : या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’; गाण्यातून उलगडल्या दिवंगत गायक अरुण दाते यांच्या आठवणी

एमपीसी न्यूज – “आपलं आयुष्य फार सुंदर आहे. ते पूर्ण जगणं आवश्यक आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपली साथ एकच गोष्ट देते ते म्हणजे आपले शरीर. म्हणून जर शरीर सुदृढ तर जगणं सुंदर… सर्व प्राण्यांमध्ये मानवाचा मेंदू सर्वश्रेष्ठ आहे. निसर्ग, कवी, साहित्यिक हे आपल्या भावना अचूक शब्दात मांडत जीवनाचा आनंद वाढवतात. शारीरिक स्वस्थ्याबरोबरच मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य देखील फार आवश्यक आहे. म्हणूनच निरोगी जगा आणि अरुण दाते म्हणतात तसे ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करा…’. असे मत ऑरेंज डायबेटीस फाउंडेशनच्या संस्थापक संचालिका डॉ. शैलजा काळे यांनी व्यक्त केले.

यावेळी ‘डॉ. शैलजा काळेज डायबेटीस अँड स्पेशालिटी क्लिनिक’च्या माहिती पत्रकाचे औपचारिक अनावरण करण्यात आले.ज्येष्ठ गायक अरुण दाते व त्यांनी गायलेल्या गीतांचे गीतकार/कवी यांची सांगड घालत एक अनोख्या संकल्पनेवर आधारित ‘नवा शुक्रतारा’ हा कार्यक्रम डॉ. शैलजा काळे यांच्या ऑरेंज डायबेटीस फाउंडेशनच्या वतीने टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप काळे, विश्वस्थ अॅड. भगवान साळुंके, प्रीती हसबनीस, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, मेधा खासगीवाले, कथक नृत्यांगना मेघना साबडे आदि उपस्थित होते.

‘नवा शुक्रतारा’चा हा 41 वा कार्यक्रम असून पुण्यातील 11 वा कार्यक्रम आहे. ऑरेंज डायबेटीस फाउंडेशनच्या डॉ. शैलजा काळे यांचे प्रभात रस्त्यावरील ‘डायबेटीस अँड स्पेशालिटी क्लिनिक’ नुकतेच सुरु झाले असून त्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मधुमेह व त्याच्याशी निगडीत सर्वच आजारांवर एकाच छताखाली उपचार करणारे राज्यातील हा एकमेव दवाखाना असल्याची माहिती काळे यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाची सुरुवात ‘श्रीराम जय राम जय जय राम..’ या भजनाने झाली. त्यानंतर ‘स्वरगंगेच्या काठावरती..’, ‘डोळे कशासाठी..’, ‘दिस नकळत जाई..’, सखी शेजारिणी तू हसत रहा..’, ‘प्रेम हे माझे तुझे…’ आदि १४ गीतकारांची अरुण दाते यांनी गायलेली गाणी सादर झाली. तसेच स्मिता लाटे यांनी आपल्या खुमासदार शैलीत 7 कवींच्या कवितांचे वाचन केले.

‘एक झाड आहे याचे माझे नाते’ ही शांता शेळके यांची कविता, ‘कळले आता घराघरांतून नागमोडीचा जिना कशाला’ ही वसंत बापट यांची, तर कुसुमाग्रज यांची ‘ओळखलत का सर मला’, सौमित्रची ‘त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो’, शंकर वैद्य यांची ‘नदीच्या काठी आपण बसलो होतो’, मंगेश पाडगावकर यांची ‘मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबत का?’ तसेच सुधीर मोघे यांची ‘क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात’ अशा कवितांचा यावेळी रसिकांनी आस्वाद घेतला.

कार्यक्रमात प्रसिद्ध गायक व संगीतकार मंदार आपटे यांच्या आवाजाला रसिकांनी भरभरून दाद दिली व गायिका श्रुती जोशी यांनी त्यांना योग्य साथ दिली. अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल दाते यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी जागवून रसिकांना भारावून टाकले.

आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे ‘शुक्रतारा मंद वारा…’ खास या गाण्यासाठी अतुल दाते यांनी गायिका प्रज्ञा देशपांडे यांना विशेष बोलावून घेतले होते. देशपांडे या एकमेव गायिका आहेत ज्यांनी अरुण दाते यांच्यासोबत ७०० हून अधिक कार्यक्रम केले आहेत. त्यांना प्रसन्न बाम (हार्मोनियम), अमित कुंटे (तबला), केदार परांजपे (कि-बोर्ड), ऋतुराज कोरे (ऱ्हीदम मशीन), प्रशांत कांबळे (ध्वनी व्यवस्था) यांची उत्तम साथसंगत मिळाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.