Pune : उमेदवार जाहीर होण्याअगोदरच पुण्यात आघाडीच्या प्रचाराला सुरुवात

एमपीसी न्यूज- पुणे लोकसभा मतदार संघासाठी अद्याप काँग्रेस पक्षाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. उमेदवार कोण असणार, हे अद्याप कळलेले नसताना देखील पुण्यात आज (रविवारी) ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन आघाडीच्या प्रचाराला सुरवात करण्यात आली आहे.

यावेळी खासदार वंदना चव्हाण, आघाडीकडून इच्छुक असणारे काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाड, माजी आमदार मोहन जोशी आणि कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले आहेत.

  • मागील काही दिवसापासून देशभरात प्रत्येक राजकीय पक्षाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी पाहावयास मिळत आहे. अशीच तयारी महाराष्ट्रात देखील पाहण्यास मिळत असून त्या पार्श्वभुमीवर राज्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

त्यामध्ये पुण्याच्या जागेसाठी महायुतीकडून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाची घोषणा करून आठवडा उलटला तरी देखील आघाडीकडून अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर झालेले नाही. माजी आमदार मोहन जोशी, महापालिका गटनेते अरविंद शिंदे आणि नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रवीण गायकवाड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

  • आघाडीकडून प्रवीण गायकवाड हे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण ते काँग्रेस पक्षाचे सदस्य नसल्याने त्यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळणे कठीण असल्याचे सांगितले जात होते. या चर्चेला सुरुवात होताच दोन दिवसांपूर्वी गायकवाड यांनी मुंबईत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे माजी आमदार मोहन जोशी यांचे नाव मागे पडले. अरविंद शिंदे आणि प्रवीण गायकवाड या दोघापैकी एकाला काँग्रेस संधी देईल असे सांगितले गेले. पण अजून देखील आघाडीकडून उमेदवाराची घोषणा न झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे.

या सर्व घडामोडी घडत असताना आज (रविवारी) पुणे शहराचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी खासदार वंदना चव्हाण, आघाडीकडून इच्छुक असणारे अरविंद शिंदे, प्रवीण गायकवाड, मोहन जोशी हे कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. यावेळी ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा देण्यात आल्या. लवकरच पक्षाकडून पुण्याचा उमेदवार जाहीर केला जाईल. अशी भावना इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.