Pune : पुण्यात बर्निंग ‘पीएमपी’चे सत्र काही थांबेना !

एमपीसी न्यूज – पुण्यात बर्निंग ‘पीएमपी’चे सत्र काही थांबताना दिसत नाही. आजपर्यंत पेट घेतलेल्या १७ बसपैकी पैकी ठेकेदारांच्या बसचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. अशा रीतीने पुणेकरांच्या जीवाशी चालेल्या खेळावरून आता संताप व्यक्त केला जात आहे.

मंगळवारी (दि. 30) दुपारी साडेतीनच्या सुमारास संचेती हाँस्पिटलसमोरील पुलावर एका पीएमपीएमएल बसला आग लागली. विश्रांतवाडीवरुन अडीच वाजता कोथरुडसाठी ( MH 12 HB1614) बस मार्गक्रमण करत होती. संचेती पुलावर बस आल्यावर बसच्या इंजिनमधून धूर बाहेर येऊ लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. यानंतर चालकाने गाडी बंद करुन खाली उतरुन पाहीले असता धुराचे प्रमाण जास्त असल्याने चालकाने तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवून दिले. आणि चालकानेच अग्निशमन दल, पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. मात्र, तोपर्यंत बस पूर्णतः आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

यानंतर अग्निशामन यंत्राच्या सहाय्याने आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र मात्र आगीचे प्रमाण एवढे मोठे होते की, पूर्ण बस जळून खाक झाली. या घटनेनंतर आता प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील बसेसला आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 20 एप्रिल 2016 ते 30 ऑक्टोबर 2018 दरम्यान चालू मार्गावर तब्बल 17 बसेसने अचानक पेट घेतल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. यात पीएमपीच्या मालकीच्या आणि ठेकेदारांच्या बस यांचा समावेश आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळातील ताफ्यात मालकीच्या 1440 तर ठेकेदारांच्या 653 बसेस आहेत. यात जुन्या बसची संख्या लक्षणीय आहे. महिनाभरापूर्वी कोथरूड डेपोत उभ्या असलेल्या बसने अचानक पेट घेतला होता. ही बस ठेकेदारांकडून चालवण्यात येत होती. एकूणच पेटलेल्या 17 बसपैकी ठेकेदारांच्या बसचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.

तसेच, जुन्या बसची वेळेवर देखभाल दुरुस्ती होणेही गरजेचे आहे. तशा सूचना डेपो प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. मात्र, अचानक बस पेट घेत असल्याने देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आग लागणे, मेंटेनन्सअभावी बसचा अपघात होणे यामध्ये ठेकेदारांकडून चालवण्यात येणाऱ्या बसचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ठेकेदारांवर वेळीच लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

अशा रीतीने पुणेकरांच्या जीवाशी चाललेल्या खेळावरून आता संताप व्यक्त केला जात आहे. पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे म्हणाले, “पीएमपी प्रशासनाला प्रवाशांच्या सुरक्षेची खरच काळजी काळजी आहे का ? हा खरा प्रश्न आहे. चीफ फायर ऑफिसर यांनी अशा आगीच्या घटना झाल्यावर त्याचा रिपोर्ट तयार करून सूचना घ्यायच्या असतात मात्र त्यांनी यात काही काम केले की नाही हाच खरा संशोधनाचा विषय दिसत आहे. पीएमपी प्रशासनाला पुणेकरांच्या जीवांशी खेळण्याचा काही अधिकार नाही त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन सरळ घरी निघून जावं”

याबाबत पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) संचालक सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “ठेकेदारांची आर्थिक स्थिती मधल्या काळात बिघडली असल्याने मेंटेनन्स करण्यात त्यांना अडचणी येत आहेत. आम्ही त्यांना वारंवार वार्निंग देऊन झाल्या आहेत. आता ३ नोव्हेंबरला याविषयी आम्ही सविस्तर चर्चा करणार असून त्या बैठकीत अशा अडचणीत सापडलेल्या ठेकेदारांना पुढे ठेवायची की नाही यावर निर्णय घेतला जाणार आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.