Pune : ‘सीएए’ कायदा म्हणजे 70 वर्षात केलेल्या घोडचुकांची दुरुस्ती -सुनील देवधर

एमपीसी न्यूज – नागरिकत्व सुधारणा कायदा आणण्याबाबत महात्मा गांधी, पंडित नेहरु, लालबहादूर शास्त्री, मनमोहन सिंग, प्रकाश कारत आदींनी सांगितले. मात्र, ७० वर्षे हा कायदा प्रतिक्षित ठेवला. परिणामी शेजारील देशांतील लाखो निर्वासित भारतीयांना आपला जीव गमवावा लागला, अनेक स्त्रियांना अनन्वित अत्याचार सहन करावे लागले. यापुढे कोणत्याही हिंदू नागरिकांवर अन्याय होऊ नये आणि शरणार्थींना भारतीय नागरित्वाचा हक्क बहाल व्हावा, यासाठी हा कायदा महत्वाचा आहे. जे गेल्या ७० वर्षात होऊ शकले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी करून दाखवत 70 वर्षात झालेल्या घोडचुकांची दुरुस्ती केली आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केले.

या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटक राजेश पांडे, नगरसेविका मंजुषा नागपुरे, बाबा मिसाळ, संयोजक दीपक नागपुरे, निलेश भिसे आदी उपस्थित होते.

सुनील देवधर म्हणाले, हिंदू समाज सहिष्णू आणि शांतताप्रिय आहे. या समाजाला कोणीही सहिष्णुतेचे धडे देण्याची गरज नाही. सहिष्णुता आमच्या नसानसात आहे. स्त्री-पुरुष समानतेची शिकवण देण्याचीही गरज नाही. डॉ. आंबेडकर हिंदू समाजातील सर्वश्रेष्ठ समाजसुधारक होते. आजकालच्या ढोंगी आणि देशविरोधी आंबेडकरवादी नेत्यांनी जाणीवपूर्वक हिंदू समाजात दुही निर्माण करण्यासाठी आंबेडकरांना दलित समाजापुरते मर्यादित ठेवले आहे. आपण सर्वांनी फुले आणि आंबेडकरांना वाचून समजून घेतले पाहिजे.

नोटबंदीमुळे दहशतवादाचे कंबरडे मोडले. काश्मीर वगळता देशाच्या इतर कोणत्याही भागात मोदी सरकारच्या कारकिर्दीत दहशतवादी हल्ला झाला नाही. मोदी सरकारच्या टीकाकार ढोंगी आणि संधीसाधू अवॉर्डवापसी गँगच्या सदस्यांनी केवळ पुरस्कार परत करण्यापेक्षा, त्यासोबत मिळालेला धनादेशही परत करायला हवा. जेएनयू ही एक उत्तम शैक्षणिक संस्था आहे परंतु मूठभर विद्यार्थ्यांमुळे संस्थेचे नाव बदनाम होत आहे असेही ते म्हणाले.

यावेळी उपस्थित चंद्रकांत पाटील म्हणाले, “शहरी नक्षलवाद मोडून काढण्याचा प्रयत्न केल्याने डाव्या संघटना देशांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा कायदा मुस्लिमविरोधी नाही. सामान्यांनी हा कायदा समजून घ्यावा. शाहीनबाग हा घडवून आणलेला कट आहे. हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे आज उद्धव ठाकरेही सत्तेच्या ओघात द्विधा मानस्थितीत आहेत. या कायद्याबाबत अपप्रचार करणाऱ्या डाव्या संघटना, काँग्रेस आणि इतर प्रवृत्तींना आपण एकत्रितपणे बाजूला सारले पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक नागपुरे यांनी केले तर प्राज भिलारे यांनी सूत्रसंचालन केले. मंजुषा नागपुरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.