Pune Loksabha : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा

एमपीसी न्यूज – आगामी पुणे लोकसभा निवडणूक (Pune Loksabha) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. सध्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा आहे. या नावात फडणवीस यांचे नाव आल्याने खमंग चर्चांना उधाण आले आहे.

फडणवीस यांनी पुणे लोकसभा निवडणूक लढविली तर तेच आगामी काळात पुण्याचे नेतृत्व करणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपतर्फे 3 नावांची चर्चा सुरू असले तरी चौथे नाव अचानकपणे येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे चौथे नाव फडणवीस असल्यास त्यांना पुणे लोकसभा निवडणूक फारशी जड जाणार नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, फडणवीस जरी उभे राहिले तरी, पुण्यातून आपणच विजयी होणार असल्याचा दावा आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

Chikhali : चिखलीतून अपहरण झालेल्या मुलीची हिमाचल प्रदेश मधून सुटका

काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्या नावाची पुणे लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा सुरू आहे. आमदार धंगेकर यांना आता संधी (Pune Loksabha) दिल्याने त्यांच्या ऐवजी दुसऱ्या उमेदवारांचा विचार व्हावा, अशी मागणी इतर इच्छुक उमेदवारांतर्फे करण्यात येत आहे.

कसबा पोटनिवडणुकीत धंगेकर यांचा विजय झाल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात पराभव करता येऊ शकतो, हा संदेश गेला आहे. त्यामुळे काँग्रेसतर्फे तब्बल 20 जणांनी उमेदवारी अर्ज पाक्षाकडे दाखल केला आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रबळ इच्छुक उमेदवारांचे नाव पुढे येत नाही. त्यामुळे पुन्हा सर्व्हे करण्यावर भर देण्यात आला आहे. तर, फडणवीस यांच्या उमेदवारीमुळे पुणे लोकसभा निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.