Pune :छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाची माफी मागावी- रोहन सुरवसे-पाटील 

एमपीसी न्यूज – अहमदनगर येथे झालेल्या ओबीसी एल्गार (Pune) मेळाव्यात बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाभिक समाजासंदर्भात केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे.
नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, छगन भुजबळ  (Pune)यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी नाभिक समाजाचे नेते व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी केली.
‘राज्यातील न्हावी समाजाने मराठा समाजातील लोकांची हजामत करू नये’ असे वादग्रस्त आवाहन छगन भुजबळ यांनी केले होते. यावर राज्यभारतील नाभिक समाजाकडून आक्षेप नोंदवून निषेध व्यक्त केला जात आहे. भुजबळ यांनी माफी मागितली नाही, तर राज्यभरात निषेध आंदोलन करण्याचा इशाराही सुरवसे पाटील यांनी दिला.

रोहन सुरवसे-पाटील म्हणाले, “मीदेखील ओबीसी समाजाचाच भाग आहे. छगन भुजबळ ओबीसी समाजासाठी लढत आहेत. ही लढाई लढत असताना त्यांनी ओबीसी समाजातील जातींचा सन्मानपूर्वक उल्लेख करावा. कुणाचीही अस्मिता दुखावली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. न्हावी या शब्दाऐवजी नाभिक असा उल्लेख भुजबळ यांनी करायला हवा होता. तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये टाळावीत.”
“नाभिक समाजाचा परंपरागत व्यवसाय हा सर्व समाजाची सेवा करून उदरनिर्वाह करण्याचे साधन आहे. सर्व जाती आणि धर्मातील लोकांची हजामत करून, सेवा करून त्याद्वारे नाभिक समाज बांधव रोजीरोटी कमावतात. त्यामुळे समाज बांधवांनी भुजबळांचे ऐकून कोणत्याही समाजावर बहिष्कार टाकून व्यवसायात अडथळा निर्माण करून घेऊ नये. भुजबळ यांनी इथून पुढे बोलताना तारतम्य बाळगावे. कोणाच्या तरी स्क्रिप्टनुसार भाषणबाजी करू नये, अन्यथा त्यांना ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात येईल,” असेही त्यांनी नमूद केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.