Pune: महा ई-सेवा केंद्र, सामान्य सेवा केंद्र रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी

जिल्हयातील शेतकऱ्यांना पीक विमा वेळेत भरण्यासाठी महा ई सेवा केंद्र व सामान्य सेवा केंद्र 31 जुलै 2020 पर्यंत सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत किंवा रांगेतील शेतकरी संपेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी

एमपीसी न्यूज – जिल्हयातील शेतक-यांना पीक विमा भरण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला असल्यामुळे कोणताही शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहू नये. याकरीता जिल्हयातील शेतकऱ्यांना पीक विमा वेळेत भरण्यासाठी महा ई सेवा केंद्र व सामान्य सेवा केंद्र 31 जुलै 2020 पर्यंत सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत किंवा रांगेतील शेतकरी संपेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहे.

कोरोना (COVID-19) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार संसर्गजन्य म्हणून घोषित केलेला आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोख्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केले आहे.

जिल्हयात कोराना बाधीत रुग्णांच्या संपर्कात लोकानी येवू नये म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सांयकाळी 5 ते सकाळी 7 या कालावधीत संपुर्ण जिल्हयात मनाई आदेश लागू केले आहे.

या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत सेतु केंद्र व महा ई सेवा केंद्र व केंद्र चालक/आदेशाचे पालन न करणारे कोणतीही व्यक्ती किंवा संस्था शिक्षेस पात्र असून संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस स्थानक प्रभारी अधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 व 52 तसेच साथरोग प्रतिबंधक 1897 अन्वये व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार व महाराष्ट्र कोविड उपाय योजना नियम 2020 मधील तरतुदी नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.