Pune : पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त रॅली ; पुणेकरांचा बंदला संमिश्र प्रतिसाद

मोर्चा पुढे जाताच दुकाने सुरू

एमपीसी न्यूज- इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पुण्यात एक लिटर पेट्रोलसाठी 88.12 रुपये मोजावे लागत आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असताना दुसरीकडे रुपयाची घसरण सुरूच आहे. मोदी सरकारचे हे अपयश जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून ‘भारत बंद’च्या माध्यमातून केला जात आहे.

पुण्यात देखील बंदचे पडसाद उमटायला सकाळपासूनच सुरवात झाली. मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी कुमठेकर रस्त्यावर पीएमटी बस वर दगडफेक करत आंदोलनाला सुरवात केली तर कोथरूड मध्ये काही अज्ञातांनी पहाटे एक पीएमटी बसला आग लावल्याची घटना समोर आली आहे. तर पुण्यातील वारजे, कर्वे नगर, पौड रोड येथील व्यापाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवत आपली दुकाने बंद ठेवली.

पुण्यातील मंडई येथील टिळक पुतळा येथून इंधन दरवाढीकला विरोध करण्यासाठी शहरातील काँग्रेस नेत्यांनी घोडागाडी मधून निषेध मोर्चा काढत नागरिकांना या बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या निषेध आंदोलनात माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार ,संजय बालगुडे, मोहन जोशी, सदानंद शेट्टी आदी उपस्थित होते.

पुण्यातील कॅम्प भागात राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी संयुक्त मोर्चा काढत नागरिकांना बंद मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे हे सहभागी झाले होते. मात्र , पुणेकरांचा या बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मोर्चा जाताच कॅम्प परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली.

पुण्यात कोंढवा येथील ज्योती चौकामध्ये मनसे आणि काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.