Pimpri News : ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातील अनेक पक्ष आणि शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी देखील या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 8) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील हा बंद पाळण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिका-यांसोबत बैठक घेतली.

पंजाब आणि हरियाणा येथील शेतक-यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यातील बदलाबाबत आक्षेप घेत आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचे पडसाद देशभर ठिकठिकाणी उमटत आहेत. त्यात उद्या, मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी दिवसभर काही पदाधिकारी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आणि अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवणार आहेत.

सध्या सुरु असलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील विविध पक्ष आणि संघटनांच्या पदाधिका-यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पोलिसांनी पदाधिका-यांना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी न करण्याच्या तसेच काळजी घेण्याच्या सूचना केल्या.

एका ठिकाणी जास्त लोकांनी जमू नये. कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची खबरदारी घ्यावी. प्रातिनिधिक स्वरूपात धरणे आंदोलन करावे, अशा सूचना पोलिसांनी विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, भारत बंद आंदोलनात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही. तसेच कोरोना साथीचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घेण्याचे आश्वासन विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिका-यांनी दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.