Pune : कोरोना आणि मदतीवरुन भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादीत वादंग

एमपीसीन्यूज : कोरोना संसर्गाच्या नियंत्रणावरुन भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय वादंग निर्माण झाले आहेत. एकीकडे कोरोनाचा संसर्ग पुण्यामध्ये नियंत्रणात आलेला नाही आणि दुसरीकडे त्यावरुन शहरातले राजकारण ढवळून निघाले आहे.

भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांनी मंगळवारी पालिका आयुक्तांची भेट घेतली आणि कोरोना नियंत्रणात न आल्याचा ठपका प्रशासनावरच ठेवला. प्रतिबंधित क्षेत्रात धान्याच्या कीट्सचे वाटप बरोबर झाले नाही, रुग्णांसाठी बेड्सची व्यवस्था नीट करता आली नाही आदी मुद्दे बापट यांनी मांडले.

याखेरीज पालकमंत्री अजित पवार यांचे पुण्याकडे दुर्लक्ष झाले. राज्य सरकारलाही परिस्थिती व्यवस्थित हाताळणे जमले नाही, असे आरोप बापट यांनी केले. बापट यांच्या भेटीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून पत्रकबाजी करण्यात आली.

महापालिकेत भाजपचीच सत्ता आहे. बापट यांनी प्रशासनावर नाहक टीका केली आहे. खरे तर बापट यांनी भाजपचीच फजिती केली आहे, अशी टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

गेले दोन महिने बापट होते कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. बापटांच्या आरोपांना आयुक्तांच्या वतीने महापौरांनीच उत्तरे दिली आणि बापटांच्या शिष्टमंडळाचा फज्जा उडाला, असे जोशी यांनी म्हटले आहे.

पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करण्यापेक्षा लॉकडाऊनच्या ५७ दिवसांमध्ये आपण कुठे होतो याचे उत्तर बापटांनी द्यायला हवे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

भाजपचे नेते केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकारकडून पुणे शहराला कोणती मदत मिळवून दिली याचा खुलासा करावा, असेही जगताप यांनी म्हटले आहे. महापालिकेच्या मुख्य सभेत भाजपला याचा जाब विचारु, असाही इशारा जगताप यांनी दिला आहे.

अजित पवार पुण्यात किती दिवस होते? असा प्रश्न भाजपचे माजी नगरसेवक उज्वल केसकर यांनी जगताप यांना विचारला आहे. नेतृत्वाकडे कौशल्य नाही अशी टीका काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. त्या टीकेचा अर्थ नीट समजून घ्या, असेही केसकर यांनी म्हटले आहे.

बापट यांनी स्वतः तसेच असंख्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मदतकार्य केले आहे असे नगरसेवक दीपक पोटे यांनी म्हटले आहे. बापट साहेबांच्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये खूप रोपटी वाढत आहेत त्यात तुमच्या पक्षातीलही आहेत असे प्रत्यूत्तर पोटे यांनी जगताप यांना दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.