Pune Corona News: पोलीस दलातही कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले, 42 पोलीस कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज – मागिल काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. पोलीस दलातही याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत पुणे पोलीस दलातील 1 हजार 530 पोलिसांना कोरोना झाला असून यातील 42 पोलिसांवर अजूनही उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

बंदोबस्त, नाकाबंदीसह अनेकांच्या संपर्कात येणाऱ्या पोलिसांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. आतापर्यंत 158 पोलीस अधिकाऱ्यांसह 1 हजार 372 कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाने ग्रासले आहे. त्यापैकी बहुतांश जण उपचारानंतर घरी परतले होते. मागील काही महिन्यांत संसर्ग कमी झाल्यानंतर उपचार घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या 4 पर्यंत होती. मात्र, आता कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर पुन्हा बाधित होणाऱ्या पोलिसांची संख्या वेगाने वाढत आहे.

शहरात सध्या कोरोनाग्रस्त 42 पोलीस उपचार घेत असून त्यामध्ये 9 अधिकारी व 33 कर्मचारी आहेत. 42 पैकी 16 पोलीस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. 26 जण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी उपचार घेत आहेत. त्यामुळे पोलिसांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, मागील आठवड्यात शास्त्री रस्त्यावर एमपीएसीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी बंदोबस्तावर असणारे विशेष शाखेतील दोन अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांच्या संपर्कातील पोलीस क्वारंटाईन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.