Pune : कोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे पुणे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मिळकत कर मोठ्या प्रमाणात थकला आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा हा मुख्य स्रोत आहे. राज्य शासनाकडून एप्रिल महिन्यासाठी जीएसटीपोटी मिळणाऱ्या १४० कोटी रुपयांपैकी फक्त ५० कोटी रुपयेच मिळाले आहेत. तर, महापालिकेला मार्च अखेरपर्यंत एकूण उत्पन्नात सुमारे २०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

याचा परिणाम महापालिकेच्या विकासकामांवरही होण्याची चिन्हे आहेत. सध्या कोरोनामुळे 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेची सर्वच विकासकामे बंद आहेत. शहरात ठिकठिकाणी अर्धवट कामे असल्याचे चित्र आहे. आगामी काळात नागरसेवकांच्या चमकोगिरीच्या कामांना आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे. पुणे शहरात समान पाणीपुरवठा व्हावा, यासाठी मोठ्या प्रमाणात खोदाई सुरू होती. त्यासाठी पुणेकरांना वाढीव दराने पाणीपट्टीही भरावी लागत आहे. ही योजना मार्गी लागल्यावर केवळ 9 टीएमसी पाणी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लॉकडाउनच्या काळात संपूर्ण देशच बंद असल्याने एप्रिल महिन्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. पुणे म्हापालिकेला दर महिन्याला साधारण १३५ ते १४० कोटी रुपये जीएसटीपोटी मिळतात. पुणे महापालिकेला ४५०० कोटी रुपये उत्पन्न मिळणे आवश्यक होते. पण, लॉकडाऊन ४३०० कोटी उत्पन्न मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यामुळे आगामी काळात महापालिका प्रशासनाला विकासकामे आणि कल्याणकारी योजना राबविणे अडचणीचे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.