Pune : पोलिस यंत्रणेबरोबर चर्चा करून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र नव्याने निर्माण करा : महापौर

Create a new micro restricted area in consultation with the police: Mayor

एमपीसी न्यूज – पोलिस यंत्रणेबरोबर चर्चा करून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र नव्याने निर्माण करण्यात यावे. तसेच त्या प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व को-मॉर्बिड व ज्येष्ठ नागरिक या सर्वांच्या आरोग्य तपासणी करण्यात याव्यात, यासाठी मनपा प्रशासनाची व स्थानिक लोकप्रतिनिधी मदत घेण्यात यावी. पॉझिटीव्ह रुग्णांवर आवश्यक ते पुढील सर्व उपचार तातडीने व्हावेत जेणेकरून कोरोना बाधित रुग्णाच्या जिवितास घोका निर्माण होणार नाही, अशा सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

प्रत्येक परिमंडळास 3 ॲम्ब्युलन्स अशा एकूण 15 ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यापैकी 1 ॲम्ब्युलन्स प्रत्येक परिमंडळाच्या ताब्यात दिलेली आहे.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय एक स्वतंत्र समन्वयक नेमून आयसीयू बेडस, ऑक्सिजन बेडस् यांची उपलब्धता स्मार्ट सिटी प्रणाली व आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत विनाविलंब माहिती घेऊन रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावे, जेणेकरुन आयसीयू बेड मिळाले नाही, म्हणून रुग्णांची परवड होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या सर्व सेवकांना प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण करणा-या सेवकांप्रमाणेच रक्कम रु. 2 प्रमाणे प्रती फॉर्म देण्यात यावेत, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.