Pune Crime News : नायजेरियन तस्कर कोकेन विक्रीसाठी पुण्यात आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला

एमपीसी न्यूज – कोकेन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी मुंबईहून पुण्यात आलेल्या एका नायजेरियन तस्कराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले.

त्याच्या ताब्यातून तब्बल सव्वा चार लाख रुपये किंमतीचे कोकेन जप्त केले आहे. शुएब तौफिक ओलाबी (वय 40, रा. नवी मुंबई) असे अटक केलेल्या नायजेरियन तरुणाचे नाव आहे. चतुःशृंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, लष्कराच्या गुप्तचर विभागाला बाणेर परिसरात होते अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती त्यांनी पुणे पोलिसांना दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बाणेर परिसरातील मित्र नगर भागात या नायजेरियन तस्कराला पकडण्यासाठी सापळा रचला होता. पोलिसांनी त्या ठिकाणी आलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेत झडती घेतली असता त्यांना त्याच्या ताब्यातून 22 ग्रॅम कोकेन सापडले. या कोकेनची किंमत जवळपास 4 लाख 14 हजार रुपये असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

आरोपी शुएब तौफिक ओलाबी हा मूळचा नायजेरियन असून भारतात तो व्यावसायिक विजा वर आला होता. त्याच्याजवळून जप्त केलेले 1 ग्रॅम कोकेन सध्या 15 ते 20 हजार रुपयांना मिळते. अंतरराष्ट्रीय बाजारात त्याची यापेक्षा अधिक किंमत आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, प्रवीण शिर्के, सुजित वाडेकर, संदीप जाधव, राहुल जोशी, प्रवीण उत्तेकर, नितीन जाधव, पांडुरंग पवार, संदेश काकडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.