Pune Crime News : शारदा गजानन मंदिरातील दागिने चोरणाऱ्या आरोपीला मुंबईत अटक

एमपीसी न्यूज – महात्मा फुले मंडई येथील शारदा-गजानन यांच्या मूर्तींवरील 25 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दानपेटीमधील काही रक्कम चोरीला गेल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेतील आरोपीला मुंबईतील दागिना बाजारातून मुंबई लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

अजय महावीर भूतकर (वय 19, रा. हिंगोली) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून सव्वा पाच लाख रुपये किमतीची दागिने व दीड लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपीला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील मंडई येथील शारदा गजानन मंदिराच्या मुख्य मंडपात तीन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास अजय भूतकर याने तोंडाला मास्क लावून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी त्याने बाप्पाच्या मूर्तीवरील दोन सोन्याचे हार, एक मंगळसूत्र, कंठी असे मिळून अंदाजे 25 तोळे सोने आणि दानपेटी मधील काही रक्कम चोरून पसार झाला.

चोरीचा सर्व प्रकार मंदिरामधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. आरोपीच्या चेहर्‍यावरील मास्क खाली आल्याने, आरोपीचा चेहरा दिसून आला. यावरून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. अनेक मार्गाने तपास सुरू असताना, काल मुंबईतील दागिना बाजारात एका व्यक्तीकडे हे सोन्याचे दागिने असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.