Pune Crime News : फुकटात बिर्याणी मागणाऱ्या पोलीस उपायुक्ताची ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

एमपीसी न्यूज – पुणे पोलीस दलात पोलीस उपायुक्त असलेल्या एका महिला अधिकाऱ्याचा फुकटात बिर्याणी मागत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये ची महिला एका कर्मचाऱ्याला आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये देखील आपण पैसे द्यायचे का ? असा सवाल विचारताना ऐकू येत आहे.

गुरुवारपासून ही ऑडिओ क्लिप वायरल झाल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील या गोष्टीची दखल घेतली असून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यातील परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांची ही ऑडीओ क्लिप असल्याचे बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वीची असलेली ही क्लिप आताच कशी बाहेर आली हा प्रश्न देखील विचारला जात आहे.

व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिप मध्ये संबंधित महिला अधिकारी पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा प्रश्न विचारते. मात्र हा पोलीस कर्मचारी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ विकत आणत असल्याचं सांगतो. परंतु मॅडम इतक्यावरच न थांबता या कर्मचाऱ्याला फुकटात खाद्यपदार्थ आणण्यासाठी बजावत असल्याचे या ऑडिओ क्लिप मध्ये ऐकायला मिळते. याशिवाय आमची नॉनव्हेज खाद्यपदार्थ कुठे कुठे चांगली मिळतात असे विचारणा देखील या मॅडम कर्मचाऱ्यांना करतात.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना या व्हायरल ऑडिओ क्लिप विषयी विचारले असता ते म्हणाले ‘ मी देखील ती ऑडिओ क्लिप ऐकली आहे. ही गंभीर बाब आहे. पोलीस आयुक्तांना मी चौकशी करून अहवाल देण्याविषयी सांगितले आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार यासंबंधी योग्य तो निर्णय घेईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.