Pune Crime : चार दिवसानंतरही पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर यांचा शोध लागेना

एमपीसी न्यूज – मागील बुधवारपासून बेपत्ता असलेल्या गौतम पाषाणकर यांचा चार दिवसानंतर ही शोध लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पाच पथके आणि शिवाजीनगर पोलिसांचे एक पथक सातत्याने काम करत आहे.

पाषाणकर ज्या ज्या ठिकाणी गेले अथवा ज्या ठिकाणी जाण्याची संभावना आहे, अशा सर्व ठिकाणांवर सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक गोष्टींच्या सहाय्याने पोलीस त्यांचा तपास घेत आहेत. गौतम पाषाणकर हे पाषाणकर ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक असून ते बांधकाम व्यवसायिकही आहेत.

बुधवारी दुपारी ते लोणी काळभोर येथील त्यांच्या गॅस एजन्सीच्या ठिकाणी कामानिमित्त गेले होते. त्यानंतर तेथून ते जंगली महाराज रस्त्यावरील त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर बुधवारी सायंकाळी त्यांनी मोटार चालकाला एक लिफाफा ताब्यात देऊन घरी देण्यास सांगितला. त्यानंतर त्यांनी चालकाला तुझे काही काम असेल तर करून ये असे सांगत मी पायी घरी येतो असे सांगितले. त्यानुसार चालकाने तो लिफाफा घरी दिला. पाषाणकर कुटुंबियांनी तो लिफाफा उघडून पहिला असता त्यात गौतम यांना व्यवसायात मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.

गौतम पाषाणकर कुणाला आढळल्यास शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (020 – 25536263) या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.