Pune Crime News : अखेर बेपत्ता गौतम पाषाणकर सापडले; जयपूर येथील हॉटेलमधून घेतले ताब्यात

एमपीसीन्यूज :  प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून 21 ऑक्टोबर पासून बेपत्ता झाले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके त्यांचा तपास करत होती. मात्र, मागील महिनाभरापासून त्यांचा तपास लागत नव्हता. परंतु आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांनी गौतम पाषाणकर यांना जयपूर येथून ताब्यात घेतले आहे.

जयपूर येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी त्यांना सुखरूप ताब्यात घेतले आहे.

गौतम पाषाणकर हे 21 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले होते. पाषाणकर हे लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेले. तेथून ते शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर एक बंद लिफाफा चालकाकडे दिला आणि हे घरी देण्यास सांगितले.

चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला. त्यानंतर पाषाणकर ऑफिस मधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले. गौतम पाषाणकर घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलीस स्थानकात धाव घेतली

तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईट नोट असल्याचं आढळून आलं. मागील काही दिवसापासुन व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी त्यात लिहिलं आहे.

यानंतर तपासाचा वेग वाढवला असून विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी पाच ते सहा पथक करून राज्यातील वेगवेगळ्या शहरात त्यांचा शोध घेतला जात होता. काही दिवसांपूर्वी ते कोल्हापूरमध्ये असल्याचेही निष्पन्न झाले होते. परंतु त्यानंतर ते पुन्हा गायब झाले. आज अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना जयपूर येथील एका हॉटेलमधून सुखरूप ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.