Pune Crime News : ‘केअर टेकर म्हणून घरात घुसायचे अन् चाकूच्या धाकाने दरोडा टाकायचे’

सहा जणांची टोळी जेरबंद : 17 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसीन्यूज : केअर टेकर म्हणून घरात घुसून सुरुवातीला संपूर्ण माहिती काढून नंतर चाकूचा धाक दाखवून जबरी दरोडा टाकणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पुणे पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी 3 दुचाकी, सोन्याचे व हिऱ्याचे दागिने आणि कॅमेरा, असा 17 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संदीप भगवान हांडे (वय 25), मंगेश बंडू गुंडे (वय 20), राहुल कैलास बावणे (वय 22), विक्रम दीपक थापा उर्फ बीके (वय 19), किशोर कल्याण चनघटे (वय 21) आणि भोलेश उर्फ कृष्णा किसन चव्हाण (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 25 एप्रिलच्या रात्री औंध परिसरातील सिंध हौसिंग सोसायटीमध्ये जबरी चोरी झाली होती. उच्चभ्रू बंगल्यामधील ज्येष्ठ दांपत्याला आणि कुकला चाकूचा धाक दाखवून 15 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला होता. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले असता वरील आरोपी हे औरंगाबाद, जालना, आणि नाशिक अशा विविध ठिकाणी असल्याचे समजले होते. त्यानंतर पोलिसांनी दोन पथके तयार करून आरोपींना अटक केली.

अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात पुणे, औरंगाबाद, जालना येथील पोलिस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत. आरोपी हे आधी केअरटेकर म्हणून संबंधित घरात जाऊन घराची रेकी करत असत आणि त्यानंतर दरोडे टाकत असत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.