Pune Crime : ‘पुणे तेथे काय उणे, दररोज घडतात गुन्हे’!

गोविंद घोळवे (ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय सल्लागार संपादक एमपीसी न्यूज)

एमपीसी न्यूज –  छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांच्या पुण्यस्पर्शाने पवित्र झालेल्या पुण्यनगरीचे रूपांतर सध्या गुन्हेगारीनगरी (Pune Crime) असे झाले की काय? पुणे तेथे काय उणे घडतात सगळीकडे दररोज गुन्हे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याबाबत गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करण्याची गरज सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत  आहेत.

फुले, शाहू, आंबेडकर, यांच्यापासून महर्षी कर्वे, आगरकर, टिळक, गाडगीळ, अत्रे, पु. ल. देशपांडे, जवळकर, मोरे यांच्यापासून वेगवेगळ्या भागातले महान नागरिकांची आवडते शहर म्हणून पहिली पसंती ही पुणे शहराला होती.

परंतु, गेल्या काही दिवसांपासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरात दिवसाढवळ्या खून, दरोडे, बलात्कार, कोयता गँग, अमूक गँग, तमुक आरोपींकडे बंदूक पिस्तूल सापडली अश्या बातम्यांमुळे शहराची वाटचाल बिहार सारखी होऊ लागली आहे. बिहार सुधारत आहे पुणे नाही अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

गेल्या काही महिन्यात दररोज वृत्तपत्रे उघडली. तर, एकाच हेडलाईन दिसते ती म्हणजे पुणे, पिंपरी- चिंचवड शहरात कोयता गँगची दहशत, अमुक मुलीवर बलात्कार, खून, दरोडा, हाणामारी, धराधरी, धमकी, खंडणी, एका राजकीय पक्षाच्या नेत्याचा खून करण्यासाठी आलेल्या गँगची पोलिसांनी केली धरपकड, याच बातम्या नागरिकांना रोज वाचायला मिळत आहेत, ही खरोखर लाजिरवाणी बाब आहे. याबाबत सर्व राजकीय पक्षांनी आत्म निरीक्षण करणे गरजेचे आहे.

एक हजार वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ‘माझे जीवाची आवडी नेईन पंढरपूर गुढी’ अशी गर्जना केली. तर, संत तुकाराम महाराज म्हणतात ‘तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे! साह्य घातलीया भय नरका जाणे!’ म्हणजे कर्म धर्माचे काम करताना घाबरू नका. सर्वधर्मसमभाव आहे. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे. परंतु, सध्याचे वातावरण पाहता माणुसकी संपत चालली असून पैसे, सत्ता, खोटी प्रतिष्ठा आणि खुर्चीसाठी वाटेल ते अशीच स्पर्धा दररोज सुरु आहे.

शहराची वाढती लोकसंख्या पाहता सरकारने दोन पोलीस आयुक्तालय निर्माण (Pune Crime) केले. पोलीस अधिकारी वर्ग वाढिवला. परंतु, गुन्हेगारी कमी होण्यापेक्षा प्रचंड वाढत आहे.

हे शहराच्या, समाजाच्या दृष्टिकोनातून घातक लक्षण आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, यांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून शांत, सय्यमी आणि सुसंस्कृत शहर ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यातील पिढी आपणास माफ करणार नाही.

एकूणच गुन्हेगारीचा आलेख पाहिला असता 20 ते 25 वयोगटातील मुले सर्रासपणे गुन्हेगारी क्षेत्रात उतरली आहेत. याचा सखोल अभ्यास केला तर असे लक्षात येते वाढती बेरोजगारी, गुन्हेगारी बद्दलचे आकर्षण, शॉर्ट्कटने पैसे कमावणे, घरातील गरिबी आणि काही राजकीय पुढाऱ्यांच्या मागेफिरून घोषणा, दररोज फुकट खाणेपिणे, गाड्या फिरवणे आणि हाच खरा मार्ग आहे अशी मानसिकता झाल्यामुळे सध्या युवा वर्ग मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळत आहे.

मुला-मुलींची प्रेम प्रकरणे, खोट्या आश्वासनाच्या पैशासाठी, फिरण्यासाठी आणि खोटे लग्नाचे आमिष यामुळे देखील मुली आकर्षित होतात. शेवटी त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन मुले त्यांचे आयुष्य तर बरबाद करतातच, परंतु वेळप्रसंगी खुनीहल्ला देखील होतो हे प्रचंड वाढले आहे.

राज्यसरकारने केवळ घोषणा आणि जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा खाजगी मार्शल नियुक्त करून (Pune Crime) महाविद्यालय, शाळा आणि गल्लोगल्ली फिरवावे. सर्व क्षेत्रातील सामाजिक संस्थांची मदत घ्यावी आणि हा गुन्हेगारीचा भस्मासूर त्वरित रोखावा; अन्यथा याचा फटका अनेकांना बसू शकतो.

गोविंद घोळवे,
(ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय सल्लागार संपादक एमपीसी न्यूज)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.