Pune : लॉकडाऊनमुळे पुणेकरांची खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

Crowds in the market for Punekar shopping due to lockdown : किराणा, भाजीपाला, पेट्रोल - डिझेल पंपावर झुंबड

एमपीसी न्यूज – येत्या सोमवारी ( दि. १३) मध्यरात्रीपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन होणार असल्याने पुणेकरांनी शुक्रवारी दुपारपासूनच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तुफान गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. किराणा, भाजीपाला, पेट्रोल – डिझेल पंपावर प्रामुख्याने गर्दी दिसून आली. तर, पुन्हा कडक लॉकडाऊन होणार असल्याने तळीरामांनीही दारूच्या दुकानांत मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

आज, शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनचे निर्देश दिल्याची बातमी संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली. पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याने पुणेकरांनी जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी आपला मोर्चा वळविला.

या दरम्यान व्यावसायिक सुद्धा आता लॉकडाऊन होणार असल्याने अधिकचे समान खरेदी करण्याचे नागरिकांना आवाहन करीत होते.

कोरोनाचे संकट पुण्यात वाढत असल्याने अजित पवार यांनी धडाकेबाज निर्णय घेतला. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनीही मध्यंतरी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला होता.

पुणे शहरात कोरोनाचे 25 हजार रुग्ण झाले आहेत. रोज 4 हजार 500 कोरोनाच्या टेस्ट होत आहे. त्यामुळे रोज 1 हजारांच्या वर रुग्ण वाढतेच आहेत.

लॉकडाऊन जाहीर होणार असल्याने पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांत सायंकाळ पर्यंत दुकानाबाहेर रांगा लागल्या होत्या. कोरोनाचे हे भयंकर संकट आणखी किती महिने राहणार, असा सवाल पुणेकर उपस्थित करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.