Pune: पूरग्रस्तांसाठी विभागीय मदत कक्ष कार्यान्वित; प्रशासन हेलिकॉप्टरद्वारे पुरग्रस्तांपर्यंत वस्तू पोहोचवणार

एमपीसी न्यूज – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवारा कॅम्पमधील पूरग्रस्तांसाठी तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. पुरवठा शाखेच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे यांच्या स्तरावर हा कक्ष कार्यरत राहणार असून सांगली जिल्ह्यामध्ये या वस्तू वाहनाने तर कोल्हापूरला हेलिकॉप्टरद्वारे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना मदत देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी विभागीय मदत कक्षामध्ये आपली वस्तू स्वरुपातील मदत जमा करावी, असे आवाहन यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी केले. आर्थिक मदत करावयाची असल्यास ती मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावी, असेही त्यांनी सांगितले.

  • पूरग्रस्तांसाठी मदत करु इच्छिणाऱ्या व्यक्तींनी कार्यालयीन वेळेत या कक्षात वस्तू स्वरुपात मदत जमा करावयाची आहे. यामध्ये ब्लँकेट्स, सतरंजी, लहान मुलांचे कपडे, साड्या, टॉवेल, महिलांसाठी किट (साडी, टॉवेल, सॅनिटरी नॅपकीन इत्यादी) तसेच पुरुषांसाठी किट (टी-शर्ट, बर्मुडा, स्वेटर इत्यादी) लहान मुले व मुलींसाठीचा पोशाख स्वीकारले जातील. परंतु, केवळ नवीन कपडे स्वीकारली जातील. जुने कपडे देऊ नयेत.

याबरोबरच टिकाऊ अन्नपदार्थ यात बिस्कीटचे पुडे, सीलबंद खाण्याची पाकिटे, मॅगी, चहा पावडर, भडंग-मुरमुरे, ओआरएस, मेडीक्लोर, टूथपेस्ट-टूथब्रश, दंतमंजन, साबण, खोबरेल तेल, कंगवा, सॉक्स, स्लिपर, मिनरल वॉटर बॉटल, हेल्थ ड्रिंक, मेणबत्ती-काडीपेटी, मच्छर अगरबत्ती, पत्रावळी, टॉर्च अशा वस्तू स्वीकारल्या जातील. त्याचबरोबर साखर-मीठ, बेसन, गोडतेल, पीठ, तांदूळ, डाळी, कडधान्य अशा स्वरूपाचा किराणा माल देखील स्वीकारला जाईल, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी दिघे (संपर्क 99235 90021) या क्रमांकावर संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.