Pune: डॉ. चंदनवाले यांच्या उचलबांगडीनंतर ‘ससून’चे उपअधिष्ठाता तांबे अचानक पडले आजारी

एमपीसी न्यूज – ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी उपअधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांची नियुक्ती करण्यात आली, नियुक्तीनंतर डॉ. तांबे अचानकपणे आजारी पडले आहेत. त्यामुळे ससून रुग्णालयाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यावर येऊन पडली आहे.

ससून रुग्णालयात जास्त प्रमाणात मृत्यू होत असल्याने रुग्णावर योग्य ते उपचार करण्यात येत नसल्याच्या तक्रारी सातत्याने करण्यात येत होत्या. काही लोकप्रतिनिधींनी देखील या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. प्रासारमध्यमांतही यासंबंधीचा आवाज उठविण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शासनाने डॉ. चंदनवाले यांची तडकाफडकी मुंबईत बदली केली. त्यांच्या बदलीचे तीव्र पडसाद ससून रुग्णालयात उमटले आहेत. डॉ. चंदनवले यांची बदली अन्यायकारक असल्याचे रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर, नर्सेसचे म्हणणे आहे. त्यातच डॉ. चंदनवाले यांचा कार्यभार सोपविण्यात आलेले उपअधिष्ठाता डॉ. तांबे हे अचानक आजारी पडल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

ससून सर्वोपचार रुग्णालयात सर्वाधिक चिंताजनक असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येतात. सुरुवातीपासूनच कोरोनासाठी हे रुग्णालय सहकार्य करीत नसल्याचा सूर व्यक्त करण्यात येत होता. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चंदनवाले यांची तातडीने बदली करण्याची मागणी केली होती. 

पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात कोरोनाचा रुग्णांवर चांगले उपचार होत आहेत. त्याठिकाणी या रोगामुळे कमी मृत्यू होत आहेत. मग ससून रुग्णालयातच का जास्त मृत्यू होत आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. सध्या कोरोनाची पुणे शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. पुणे जिल्हा प्रशासन, पुणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस, डॉक्टर सर्वच जण कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, कोरोना काही कमी होताना दिसून येत नाही. ससून रुग्णालयाच्या आवारातील नवीन इमारतीमध्ये कोरोना रुग्णांसाठी विशेष रुग्णालय सुरू करण्यात आले आहे, मात्र या अधिष्ठाता बदलीमुळे निर्माण झालेल्या वादाचे परिणाम रुग्णांना भोगावे लागू नयेत, अशी अपेक्षा रुग्णांच्या नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.