Pune News : रिक्षा चालकांना आंदोलन न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

एमपीसी न्यूज : राज्यात बेकायदेशिररित्या व विनापरवानगी चालणाऱ्या बाईक टॅक्सी ॲपवर बंदी घालण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडे (Pune News) पाठपुरावा करण्यात येत असून नागरिकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी रिक्षा चालकांनी 12 डिसेंबरचे आंदोलन करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

रिक्षा चालकांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रिक्षा चालकांच्या न्याय्य मागण्यांबाबत विचार करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गठीत समितीमध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस उपआयुक्त (सायबर शाखा), पोलीस उपआयुक्त (वाहतूक), पोलीस उपआयुक्त(गुन्हे) आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने 7 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत बाईक टॅक्सी ॲपवर कारवाईबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत.

Pimple Gurav News : महापालिकेतर्फे पुलेला गोपीचंद, मंजुषा कनवर यांचा उद्या सत्कार  

जिल्हा प्रशासनाने रिक्षा चालकांच्या न्याय्य मागण्यांबाबत नेहमीच सहानुभूतीने विचार केला आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर वाहतूक होऊ नये यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातर्फेदेखील विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

बेकायदेशीर बाईक टॅक्सी ॲप चालविणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई सुरूच असून ॲपवर बंदी घालण्याबाबत राज्याच्या सायबर शाखेकडे पोलीस उपआयुक्तांमार्फत पाठपुरवा करण्यात येत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता रिक्षा चालकांनी आंदोलन करणे उचित होणार नाही. अशा आंदोलनामुळे नागरिकांची अधिक प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे.

रिक्षा चालकांनी नेहमीच प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. शिवाय रिक्षा चालकांच्या समस्यांबाबतही प्रशासन संवेदनशिलतेने निर्णय घेत असते.(Pune News) स्वत: पालकमंत्र्यांनीदेखील त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून गृह आणि परिवहन विभागाकडेदेखील बाईक टॅक्सी ॲपवर बंदी घालण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. हे लक्षात घेता रिक्षा चालकांनी आंदोलन करू नये आणि यावेळीदेखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ.देशमुख यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.